NC Times

NC Times

शेत शिवारातुन 'खळे' च झाले गायब,सर्वत्रच यांत्रिकीकरणावर भर


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर/(जालिंदर शिंदे) :- सध्या शिवारात खरीप हंगामातील पिकांच्या मळणीची मोठ्या प्रमाणात लगबग सुरू आहे.जिकडेतिकडे केवळ मळणी यंत्राचीच धामधूम सुरू आहे.पण पारंपरिक  'मळणीसाठीचे खळे' कुठे दिसेनासे झाले आहे.पुर्वी शेतात पिक तयार झाले की धान्याची रास करण्यासाठी शेतकरी शेतातच धान्य मिळण्यासाठी  'खळे' तयार करत असे आणि तेच त्यांचे मळणी यंत्र असे.
पुर्वीची शेती लक्षात घेतली की प्रकर्षाने जाणवते ते पिक मळणीसाठी तयार केलेले  'खळे'. मळणीयंत्र येण्याच्या पुर्वी प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात गोलाकार खळे निर्माण करत असे.या खळ्याच्या मध्यभागी एक भक्कम उभे लाकूड रोवले जात असे.त्याच्या भोवतालीचा गोलाकार जमीन लाकडी चोपणीने चोपून गुळगुळीत केली जात असे.नंतर ती शेणाने सारवून घेतली जायची.अश्या प्रकारे मळणीसाठी खळ्याची निर्मिती केली जायची.
      या निर्मीत खळ्यात खुडलेल्या ज्वारी,बाजरीची कणसे पसरली जायची.मध्यभागी रोवलेल्या लाकडाच्या अवतीभवती बैल बांधले जायचे.त्यांनी धान्याला वा कणसाला बैलांनी तोंड लावू नये म्हणून त्यांच्या तोंडाला मुसक्या बांधल्या जात असत.हे बैल खळ्यात पसरलेल्या कणसावर गोलाकार फिरत.त्यांच्या या फिरण्याने कणसातून आपसूकच दाणे वेगळे होत.
      नंतर वार्याच्या वेगाच्या दिशेला उंचावर उभे राहून धान्य उपणले जायचे.यात त्यातील फोलपाटे,कचरा व निरुपयोगी हलका भाग वार्यामुळे पुढे जायाचा व धान्य खाली साठून रहायाचे.थोडक्यात खळे म्हणजे एक प्रकारचे मळणी यंत्रच होते.हे सर्व काम शेतीच्या एकरांवर आधारित चार दिवस ते पंधरा दिवस चालत असे.त्यावेळी संबंधित शेतकरीही राहण्यासाठी रानात वा शेतात जात असे.त्यामुळे त्यावेळी संपूर्ण शिवारात तात्पुरत्या का होईना चुली पेटत व गजबज दिसत असे.
      या पध्दतीने धान्य तयार करण्यासाठी मनुष्यबळ त्याचबरोबर वेळ,श्रम लागत असे.त्यामुळे बळीराजाला श्रमाची सवय रहात होती.पाळीव बैलांकडूनही शेतीची विविध कामे करुन घेतली जात असे.आता शेतीची बहुतेक सर्वच कामे ही यंत्राने केली जाऊ लागली आहेत.यामुळे शेती कामे करणाऱ्या बैलांची संख्याही रोडावली आहे आणि या सध्याच्या यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांची श्रम शक्तीही मोडली आहे हे मात्र तितकेच खरे.
 सध्याच्या यांत्रिकीकरणामुळे पुर्वी मळणीसाठी निर्माण केले जायचे ते  'खळे' गायब झाले आहे हे खरे आहे पण आजही पुरवजांनी निर्माण केलेल्या खळ्याचे जागोजागी अवशेष पहावयास मिळतात.
         -- अनिल (दादा) शिंदे.
        (शेतकरी/घाटनांद्रे)