NC Times

NC Times

कवठेमहांकाळ तालुक्यात 'लाडकी बहीण' योजना सोडून बाकी योजनांचे अनुदान रखडले


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर/जालिंदर शिंदे :- कवठेमहांकाळ तालुक्यात मुख्यमंत्री माझी  'लाडकी बहीण' योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये खात्यावर जमा होऊ लागले असले तरी गेल्या अनेक महिन्यापासून शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मिळणारे अनुदान, पी एम किसान योजना,पीक पेरा योजना,घरकुल योजना,गाय गोठे,पीकविमा आदी योजनांचे पैसे खात्यावर जमा न झाल्याने लाभार्थी व शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे.कवठेमहंकाळ तालुक्यात मुख्यमंत्री  'लाडकी बहीण' योजनेअंतर्गत बहुतांश महिलांच्या खात्यावर पैसे जमा होऊ लागल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.महिलांना अनुदान मिळावे ही अगदी चांगलीच गोष्ट आहे.त्यातच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने महिलांसाठी ५० टक्के सवलतीने तिकीट देण्याची योजना सुरू केली आहे.याचेही नोकरदार महिलांमधून स्वागत होत आहे. 
      मात्र, दुसरीकडे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत निराधार अपंग,विधवा,परितक्त्या महिलांना दर महिन्यास मिळणारे अनुदान मात्र मागील दोन महिन्यांपासून मिळालेले नाही. महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनुदान घेत असताल तर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळणार नाही अशी चर्चा असल्याने निराधार,विधवा,परितक्त्या महिलावर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे. 
       नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान मिळत होते. त्यातील पात्र काही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे.परंतु बहुतांश शेतकरी सध्या अनुदानापासून वंचित आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी कवठेमहांकाळ तालुक्यातील घरकुल योजना व गाय गोठे पूर्ण झालेले आहेत त्याचे अनुदान मिळावे अशी मागणीही केली जात आहे.