NC Times

NC Times

दिव्यांगाना विनाअट अंतोदय रेशन कार्ड व धान्यचा तात्काळ लाभ मिळण्यासाठी ८ ऑक्टोबर रोजी बोऱ्या बिस्तर घेवुन पुरवठा विभागात मुक्काम ठोकणार -मा. सुनील बागडे प्रहार संघटना


नवचैतन्य टाईम्स जत (प्रतिनिधी)-दिव्यांगाना विनाअट अंतोदय रेशन कार्ड व धान्याचा तात्काळ लाभ मिळावा, यामागणीसाठी ८ ऑक्टोबर रोजी जत तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव घेऊन तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात बोऱ्या बिस्तर घेऊन मुक्काम करणार असल्याचे निवेदन प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल बागडे यांनी जत तहसिलदार धानोरकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ नुसार ज्या दिव्यांगाना अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी स्वतंत्र शिधापत्रिका हवी आहे, अश्या दिव्यांग व्यक्तीना नवीन शिधापत्रिका व शिधापत्रिकेवर असणारे लाभ तत्काळ मिळाले पाहिजेत.
पण गेल्या 2-3 वर्षापासून दिव्यांगाचे शिधापत्रिकेचे कामकाज रखडले गेले आहे. इस्टांग शिल्लक नाही, असे उडवाउडवीची उत्तरे देऊन दिव्यांगाना टाळले जाते. त्याच बरोबर एजंटद्वारे दिव्यांगाना लुटले जाते. असे अनेक गैरप्रकार प्रहार दिव्यांग संघटनेस नजरेस आल्या आहेत. वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे वारंवार तोंडी तक्रार करून देखील गांभीर्याने घेतले जात नाही. माहितीनुसार ११ इस्टांग शिल्लक असून त्याचा दिव्यांगाना लाभ द्यावा, तसेच दिव्यांगाना तहसील कार्यालयात जाण्या -येण्या साठी रॅम्पची सुविधा नसल्याने दिव्यांग बाधवांना ये -जा करणेसाठी त्रास सहन करावा लागत आहे. तरी तात्काळ रॅम्प व्हावा तसेच दिव्यांगाना तहसील कार्यालय आवारात व्यवसायासाठी ५% राखीव गाळे मिळावेत, अशा मागण्या असून येत्या ८ ऑक्टोबर रोजी या मागण्यांसाठी जत तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव घेऊन तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात बोऱ्या बिस्तर घेऊन मुक्काम आंदोलन करणार आहेत.