NC Times

NC Times

शेती २०१९ पूर्वी नावावर असेल तरच लाभ,'पी एम किसान,नमो सन्मानसाठी नवी नियमावली,वारसा हक्क वगळला,आधारही आवश्यक


नवचैतन्य  टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर/जालिंदर शिंदे :- पी एम किसान व नमो सन्मान योजनेसाठी आता योजनेच्या नवीन नोंदणीसाठी शासनाकडून नवीन नियमावली लागू करण्यात आली असून वारसा हक्क वगळता ज्या लोकांनी २०१९ नंतर जमीन खरेदी केली असेल तर त्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार नाही.तसेच पी एम किसान योजनेसाठी नोंदणी करतांना पती,पत्नी व मुलाचे आधारकार्ड जोडावे लागणार आहे.
       केंद्र शासनाने सन २०१९ मध्ये शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजना सुरू केली.या योजनेतून शेतकऱ्याला तीन हप्त्यात वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात.तसेच आता महाराष्ट्र शासनानेही नमो सन्मान योजना लागू केली असून राज्य शासनाकडून ही राज्यातील शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यात सहा हजार रुपये मिळत आहेत.या योजनेसाठी शेतकरी म्हणून कुटुंबातील पती,पत्नी यापैकी एकाला व २०१९ पूर्वी जमीन नोंद असेल तर १८ वर्षांवरील मुलाला लाभ घेता येतो.पण काही पती,पत्नी व २०१९ नंतर जमीन नावावर झालेले तसेच माहेरकडील जमीन नावावर आहे म्हणून पती,पत्नी अर्ज नोंदणी करून या योजनेचा लाभ घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.त्यामुळे आता पात्र लाभार्थीचे निधन झाले असेल तरच वारसा हक्काने जमिनीची नोंद झाली असेल त्या पती,पत्नी पैकी एकच या योजनेसाठी पात्र असेल.शिवाय सरकारी व निमसरकारी नोकरी नसेल अथवा कर भरत नसेल तरच अशा शेतकऱ्यांना नोंदणी करून लाभ घेता येणार आहे.
पात्रतेची वानवा,तरीही घेतला जातो लाभ पी एम किसान योजनेत ऑनलाइन पोर्टलवरून स्वतःच्या नावावर कोणताही सातबारा (शेती) नसतानाही अनेकांनी सुरुवातीपासून नोंदणी केलेली आहे,त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ आजही मिळत आहे.सोबतच कित्येकांना पती,पत्नी व काही जणांचे तर घरात मुले व मुली यांची पण नोंदणी केली असल्याने एकाच घरात तीन ते चार जणांना या योजनेचा लाभ मिळत असल्याचे वास्तव आहे.
शेतकऱ्यांनी ऑनलाइन पोर्टलवर नवीन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
१)•लाभार्थी शेतकऱ्याच्या नावाचा नवीन सातबारा.
२)•अर्ज केलेल्या शेतकऱ्याच्या फेरफारमध्ये मयत व्यक्तीचा मृत्यू दिनांक १ फेब्रुवारी २०१९ पूर्वीचा असेल तर एकच फेरफार.
३)•फेब्रुवारी २०१९ नंतर मृत्यू झाला असेल तेव्हा पूर्वीचा व नंतरचा असे दोन्ही फेरफार.
४)•पती,पत्नी व मुलांचे आधारकार्ड,१२ अंकी रेशनकार्ड.