NC Times

NC Times

महाबळेश्वर येथील बाजारपेठेच्या १०० कोटींच्या सुशोभीकरणासाठी नेमणूक करण्यात आलेले वास्तुविशारद पंकज जोशी व ठेकेदार राम सवानी यांचा ठेका रद्द करुन नव्याने निविदा काढण्याचा जिल्हाधिकारी यांचा निर्णय


नवचैतन्य टाईम्स महाबळेश्वर प्रतिनिधी(शरद झावरे)-   गेल्या दोन वर्षांपासून महाबळेश्वरच्या बाजारपेठेचे महत्वाकांक्षी १०० कोटींच्या सुशोभीकरणाबाबत शहरातून विविध कारणांसाठी वाद सुरू होता. निकृष्ट बांधकाम, दर्जाहीन कॉंक्रीटचे काम व नियोजन शून्य काम शहरात गेल्या वर्षीपासून सुरू होते. याबाबत शहरातून व्यापाऱ्यांनी अनेकवेळा तक्रारी करुन देखील ठेकेदार व वास्तुविशारद यांच्यावर कोणताही परिणाम होत नव्हता तसेच कामात देखील कोणतिही सुधारणा होत नव्हती. वास्तुविशारद पंकज जोशी यांनी शहरातील व्यापाऱ्यांसोबत कोणतिही बैठक न घेता सुशोभिकरणामध्ये बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या मालकी असलेल्या मिळकतींचा समावेश केला होता. यामुळे शहरातील काही व्यापाऱ्यांचे व्यवसाय बंद होणार होते. यासाठी व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शहरातील नागरिकांच्या भावना ऐकून घेऊन चार फूट वगळून गटारापासून सुशोभीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. त्यामुळे शहरातून या निर्णयाचे स्वागत झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शहरातील नागरिकांना बोलावून काम सुरु करुन ते मे च्या उन्हाळी हंगामा अगोदर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतू वास्तुविशारद पंकज जोशी व ठेकेदार राम सवानी यांच्या मनमानी व नियोजनशून्य कारभारामुळे बाजारपेठेतील सुशोभीकरणाचे वीस टक्के काम देखील त्यांना पूर्ण करता आले नाही. तसेच केलेल्या कामाबाबत शहरातील व्यापाऱ्यांसह पर्यटकांनी देखील दर्जेबाबत व नियोजनाबाबत नाराजी व्यक्त केली होती. 
नुकताच पावसाळा संपल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी महाबळेश्वर बाजारपेठेचे काम दिवाळी हंगामापूर्वी लवकरात लवकर सुरू करुन संपविण्याचा निर्धार होता. याबाबत माहिती मिळताच शहरातील नागरिकांचे शिष्टमंडळाने आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेतली. यावेळी शहरातील सुशोभीकरणासंदर्भात चर्चा झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी वास्तुविशारद पंकज जोशी व ठेकेदार राम सवानी यांचे कामाचा दर्जा व नागरिकांच्या भावनांचा आदर राखत त्यांचे काम बंद करुन नव्याने स्पर्धा घेऊन डिझाईन फायनल करुन बाजारपेठेचे काम योग्य पध्दतीने व दर्जेदार करुन घेण्यासाठी नियोजन करत असल्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने महाबळेश्वर बाजारपेठेला न्याय मिळत असून नव्याने योग्य नियोजनपूर्वक व दर्जेदार सुशोभीकरणाचे काम सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.
आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे राजूशेठ राजपुरे यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेतली.
यावेळी मस्जिद रोड व वन विभाग कार्यालय येथील अपूर्ण काम नगरपालिकेने पूर्ण करुन घ्याव्यात अश्या सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी दिल्या आहेत.
महाबळेश्वर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या व्यथा सोडविण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना सुशोभीकरणाच्या कामातून होणारा त्रास निदर्शनास आणून दिला तसेच काम चांगले होण्यासाठी येथील व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन काम पूर्ण करण्याचा आग्रह धरला त्यामुळे जिल्हाधिकारी डुडी यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे सर्वांनीच मकरंद आबांचे व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आभार मानले.