NC Times

NC Times

श्री संभाजी लावंड यांच्या गुराखी कथा संग्रहाचे मराठी साहित्यात दमदार प्रवेश


१९९० नंतरच्या ग्रामीण साहित्यात आपल्याला विद्रोह दिसून येतो.
 तदनंतर मराठी साहित्यात  अनेक प्रवाह निर्माण झाले. त्यात ग्रामीण साहित्य हा एक महत्त्वाचा प्रवाह मानला जातो. ग्रामीण साहित्याने मराठी साहित्यात संख्यात्मक व गुणात्मक दृष्ट्या अतिशय मोलाची भर घातलेली आहे. एक नवा आशय, जीवनाचे नवे क्षेत्र मराठी वाचकांसाठी ग्रामीण साहित्याने खुले करून दिले. या अर्थाने मराठी साहित्याला समृद्ध करण्याचे कार्य व्यंकटेश मडगुळक रांच्या 'बनगरवाडी' आणि 'माणदेशी माणसे' तसेच लक्ष्मीकांत रांजणेंच्या 'एक होती बहिरेवाडी' या कादंबऱ्या गावाकुसतील संस्कृती वाचकांपर्यंत पोहचविण्यात आजरामर ठरल्या.
हाच धागा पकडत प्रा. संभाजी लावंड यांच्या आत्मकथा आपल्या समोर येत आहेत.   ग्रामीण विनोदी कथा लेखक  द.मा.मिरसदार आणि शंकर पाटील  यांच्या लेखन शैलीचा प्रभावअसल्याने त्या धाटनीचे  लेखन वाचतअसल्याचा अनुभव वाचकास आल्यवाचून नाही.                                                                            १९७२ चा भीषण दुष्काळ, गावातील राजकारण, सहकारातील भ्रष्टाचार, धरणासारख्या प्रकल्पांतून आलेले विस्थापन, शिक्षित वर्गाचे नैराश्य, पाण्याचा बिकट होत जाणारा प्रश्न, शेतकर्‍यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळण्यासाठीचे लढे, शेतीतील यांत्रिकीकरणामुळे आलेली बेरोजगारी व इतर समस्या, जागतिकीकरणा नंतरची भीषण परिस्थिती इत्यादी अनेक कारणांमुळे ग्रामीण भाग रूप बदलू लागला. पण तो तत्पूर्वी लेखकाच्या बालपणी किती समृद्ध आणि सकस होता.याचे चित्रण अत्मकथामध्ये अतिशय प्रभावीपणे लेखकांनी केलेले दिसून येते.ज्ञानाची आणि पोटाची भूक भागवताना आलेले  विदारक अनुभव लेखक सच्छेपणाने मांडतो ; तेथे कोठेही आजच्या प्रतिष्ठित जीवनाचा आडपडदा तो ठेवत नाही. लेखकाचा हा प्रामाणिकपणा वाचकाच्या मनाला भावतो.'गुराखी' या आत्मकथनात लेखकाची अचूक आणि जबरदस्त निरीक्षणशक्ती आणि वर्णनक्षमता यांच्या  मोहात आपण पडतो, आणि पुढील आत्मकथा वाचण्याचे लागीर वाचकावर होते.ग्रामीण भागातील शेती अवजारे त्यांची ग्रामीण भागातील नावे शहरी वाचकाला कदाचित बुचकळ्यात पाडतील ; पण प्रत्यक्ष शेत शिवारात गेल्याचा दृश्य अनुभव दिल्यावाचून राहणार नाहीत. शेतातला रानमेवा लेखकाच्या बालपणी गरिबीतही श्रीमंत अनुभव देत होता याचा हेवा वाटल्याशिवाय राहत नाही.लेखकाला शिकवणारे सर्व गुरूजी, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये , लकबीतर लेखक टिपतोच पण त्यांच्या बाबतीतले अनुभव व त्याचा जीवनात झालेला फायदाही तो सांगायला विसरत नाही. 'पाटीदप्तर' या आत्मकथनात जोशी गुरुजींना शाळेत यायला उशीर झाल्यावर त्यांनी स्वतःलाच करून घेतलेली शिक्षा हा प्रसंग मनाला चटका लावून जाणारा आहे.गाव शिवाबरोबर गावातले बारा बलुतेदार अलुतेदार यांचेही दर्शन आपल्याला आत्मकथनात घडते आणि आपण मनाने भूतकाळात प्रवेश करतो . 'बाटुक' आत्मकथेतील तेली भुत्या हुबेहूब डोळ्यासमोर उभा करण्याचे लेखकाचे कौशल्य अजब आहे .लेखकाचे वडील दादा त्यांचे कष्टमय जीवन त्यांचे प्रेम आठवून लेखक आजही सद्गतीत होतो व आपल्यालाही सद्गतीत करतो . लेखकाने खल्लेल्या रानमेव्याचा उल्लेख ठिकठिकाणी येतोच पण 'उपटणी'तला दवबिंदू चाखण्याचा अनुभव घेऊन बघावा असे शहरी वाचकाला वाटल्याशिवाय राहणार नाही. गावाकडचे खेळ व त्यातली अस्सल ग्रामीणता मनाला भावते. ' कोणी एके काळी' आत्मकथेत येणारे अलुतेदार व बलुतेदार गावसंपन्नन करणारे दिसतात . लेखक बालपणा पासून गावात किती विरघळला आहे ते या कथांमधून कळते. लेखकाची स्मृती पाहून आपण पुन्हा पुन्हा अचंबित होतो .'पाणवठा' आत्मकथे तील निसर्गवर्णन व कथेच्या ओघात येणारी गावातील मुले माणसे त्यांच्या केवळ नावाने नाही तर नावाला जोडून असणाऱ्या  येतात हे विशेषणासह, विशेष लक्षात राहण्यासारखे आहे.
गाव म्हटलं की भूत आलीच पण लावंडांच्या कथेतील भुतेही आगळी वेगळी . 'टकुचीवाली भुतावळ '  कथेतील वर्णन कधी अंगावर शहरा  आनते तर कधी गुदगुल्या करून हसवते.'वरवंटा' कथेत करामती संभाजी आपल्याला भेटतोच पण बहिणीची व आईची माया आणि वडिलांचा उग्र तापट स्वभावही लक्षात येतो.  लेखकाने केलेले गावाचे वर्णन वाचून एकदा तरी लेखकाच्या गाव पहावा अशी इच्छा मनात जागी झाल्या शिवाय राहत नाही .
गावात आलेली प्लेगची साथ तिची दाहकता व भयानकता वाचताना काळजात चर होते व प्लेग गेल्यानंतर गावात आलेले चैतन्य वाचकाच्या मनाला पुन्हा उभारी आणणारे असेच आहे. याच आत्मकथेत सेवागिरी महाराजांचा उल्लेखही आलेला आहे तो प्रसंनकारी आहे.उन्हाळी सुट्टीत 'पतंग' उडवण्याचे वर्णन करताना लेखकाच्या आठवणीचा पतंगही भूतकाळात विहरताना आपण अनुभव घेतो .लेखक म्हणतो त्या प्रमाणे तो व त्याचे मित्र अक्षरशः वानराच्या टोळीसारखे मुक्त जीवन जगल्याचे वाचून आपण हरखून जातो. लेखकाच्या पास होण्याचा आनंद व जून लागला की शाळेची निर्माण होणारी ओढ याच गोष्टी त्याला इतरांपेक्षा वेगळा घडवत गेल्या हे लक्षात  येते.लेखकाच्या जबरदस्त वर्णनक्षमतेचा अंदाज तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी येतोच पण 'पावसा तील संमेलन' या आत्मकथनातील पावसाळी वातावरण निर्मितीचे, पावसाचे केलेले वर्णन या दृष्टीने विशेष उल्लेखनीय वाटते . शिवाय यात येणारे पावसाळी संमेलन हाच लेखकाच्या लेखन संस्कारातील मूळ गाभा आहे हेही लक्षात येते.शिवार भर हुंदडत ,लपछपत ,चोरून खाल्लेला रानमेवा त्यासाठीची धडपड , क्लुप्ती , युक्तीया सर्व माणसाला हुशार बनविणाऱ्या निसर्गशाळा लेखकाने बालपणात शिकल्याचे 'शिवार'मध्ये वाचताना आपण जणूलेखकासोबतच वावरत असतो असा अनुभव येतो.
बहात्तरच्या दुष्काळाची दाहकता,  भीषणता मांडताना गावाची झालेली होरपळ डोळ्यासमोर येते . अक्षरशः माणसांना वेड लावणारा तो दुष्काळ होता.याचे प्रत्ययांतर देणारी काही उदाहरणे येतात आणि आपणसचिनत होऊन जातो . पण कालावधीने सर्व सुरळीत व्हायला व जनजीवन मार्गावर यायला लागते. याचे वर्णन 'दुष्काळ' या आत्मकथनात येते.
बालपणी छकडा ,बैलगाडीतून प्रवास केलेल्या लेखकाचा विमान प्रवासाचा पहिला अनुभवव त्याचे असणारे अप्रूप मुळातून वाचनीय आहे. तीर्थयात्रा करतानाचा, कधी भक्तिमय तर कधी अलिप्त अंदाज मात्र लेखकाच्या मनाचा थांग लागू देत नाही. गावातील रात्र ते पहाट या मधील घडामोडी 'कंदील' कथेत वाचायला मिळतात.शाळेची घंटा' पाहूनही लेखकाचे बालपण घनघनायला लागते . सेवानिवृत्ती नंतरही बालपणातल्या आठवणी वर्तमान काळात घडत असल्याप्रमाणे त्याच्या डोळ्यासमोर तरळत राहतात आपणही कधी लेखकासोबत भूतकाळात रममान होतो हे कळतच नाही; ह अनुभव सर्वांचाच ! नवीन पिढीच आपल्याला वास्तवात आणते हे वास्तव.गावकी आली की भावकी आलीच .लेखकाच्या इतक्या सुंदर निसर्गसंपन्न निर्मळ गावाला व जीवनाला, घरातील लग्न समारंभाला लागलेली भावकीची नजर आपल्यालाही व्यथित केल्याशिवाय राहत नाही. गावाकडची माती जीवाला वेड लावणारी ,अनेक माणसे घडविणारी कशी असते हे लेखक उदाहरणांसह आपल्यासमोर मांडतो.
या मातीत खेळलेले खेळ जरी गावठी असले तरी अस्सल मातीतले आहेत व बालपणातच कार्यानुभव देणारे समृद्ध आहेत. असे कार्य अनुभव आपण आजच्या पिढीला देऊ शकत नाही याची उणीव जाणवल्याशिवाय राहत नाही.उचापती' करणे, चोऱ्या करणे हा बालपणातला सुसंस्कृत उद्योग लेखक हातचे न राखाता सांगतो व कबूल करतो तेव्हा वाचकांनाही आपल्या बालपणात डोकवायला संधी मिळते.
आत्मकथनात्मक कथांचे एक वेगळे दालन यानिमित्ताने मराठी साहित्यात अधिकची भर घालत आहे. प्राध्यापक संभाजी लावंड यांच्या या पहिल्या आत्मकथनाचे स्वागत वाचक करतील याची मला खात्री आहे. त्यांच्या या बालपण ते कुमार वयातील आत्म कथनानंतर तरुणपणातील अनुभवांचे आत्मकथन लवकरच आपल्यासमोर यावे यासाठी त्यांना शुभेच्छा.
   - राजेश भोज (वाई)