NC Times

NC Times

यावेळी जतमधून लिंगायत समाजाच आमदार विधानसभेत पाठवा -मा.खासदार अजित गोपछडे


नवचैतन्य टाईम्स जत (प्रतिनिधी)-
जत तालुक्यात लिंगायत समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे यावेळी लिंगायत समाजाचा आमदार झाला पाहिजे, सन्मान यात्रेचा तोच मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन भाजपचे राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
खा. गोपछडे हे लिंगायत समाजाचे नेते असून त्यांनी महाराष्ट्रभर वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा आज गुरुवारी जत येथे पोहोचली. गुड्डापूर, जत व बिळूर या ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या.
खा. गोपछडे यांची सन्मान यात्रा आयोजित करण्यामध्ये भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांचा पुढाकार होता. केंद्रीय सिमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ. रवींद्र आरळी, उमदीचे नेते संजय तेली, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रशेखर गोब्बी यांनी यात्रेच्या नियोजनात पुढाकार घेतला होता. मात्र जतमधून लिंगायत समाजाला भाजपकडून प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. याबाबत खा. गोपछडे यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली. त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांची चांगलीच गोची झाली आहे.
जत येथील डॉ रविंद्र अरळी शैक्षणिक संकुल येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला . यावेळी डॉ रविंद्र अरळी, संजय तेली, डॉ. चिकोडी उपस्थित होते. खा‌ गोपछडे म्हणाले की , लिंगायत समाजाचे महाराष्ट्रात २२ आमदार होते. सध्या ५ ते ६ च आमदार आहेत. लिंगायत समाजाला योग्य प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व मिळावे यासाठी भक्ती स्थळ ते शक्ति स्थळ अशी सोळा जिल्ह्यातून जाणारी सन्मान यात्रा काढली आहे.
जतमध्ये लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व मिळावे हा या सन्मान यात्रेचा हेतू आहे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने एकाच नेत्याच्या पाठीशी उभे राहावे. सर्व गटतट विसरून एकत्र यावे. तरच लिंगायत समाजाचे व या तालुक्याचे कल्याण होईल असेही खा. गोपछडे म्हणाले.