NC Times

NC Times

शिक्षकांना गुरुस्थानी मोठे आदराचे स्थान-जालिंदर शिंदे


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):-
मुलांना पालकांनी शिक्षकांच्या सावधीन केल्या नंतर शिक्षकच खर्या अर्थाने मुलांच्या जीवनाला चांगला आकार देऊन त्यांना देशाचा सुजाण नागरिक बनवत असल्याने शिक्षकांना गुरुस्थानी मोठे आदराचे स्थान असल्याचे मत पत्रकार जालिंदर शिंदे यांनी घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकदिन व पारितोषिक वितरण समारंभा प्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.अध्यक्षस्थांनी मुख्याध्यापक राजेंद्र पाटील होते तर शालेय व्यवस्थापन समितीचे नवनियुक्त अध्यक्ष संतोष पाटील व उपाध्यक्षा मेघा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जालिंदर शिंदे पुढे म्हणाले की माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन् हे पेशाने शिक्षकच होते.पण पुढे ते आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरच ते सुजाण भारताचे मोठे कर्तबगार राष्ट्रपती बनले.येथेच खर्या अर्थाने शिक्षकांचे कर्तुत्व अधोरेखित होत असल्याचे दिसून येते.तर शिक्षक,पालक व सदस्य यांनी दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चांगले प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी यावेळी बोलतांना सांगितले.प्रारंभी स्वागत प्रास्ताविक करताना लक्ष्मण मोहिते यांनी शिक्षकदिनाचे अगदी मोजक्याच शब्दात पण मोठे महत्त्व विशद केले.
यावेळी स्व विठोबा मारुती पवार यांच्या स्मरणार्थ गोरख पवार यांनी शाळेतील प्रत्येक वर्गातील गतवर्षी आलेल्या प्रथम तीन क्रमांकांच्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी पत्रकार जालिंदर शिंदे, मुख्याध्यापक राजेंद्र पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष सौ मेघा शिंदे, सामाजिक कार्यकर्ते गोरख पवार,शिक्षक सर्वश्री लक्ष्मण मोहिते,सौ सुनंदा पाटील,सौ कोमल शिंदेसह विद्यार्थी,पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी स्वागत प्रास्ताविक लक्ष्मण मोहिते यांनी तर आभार सौ सुनंदा पाटील यांनी मानले.