NC Times

NC Times

कुची येथे बेकरीस आग,बारा लाखाचे नुकसान


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- 
कुची (ता कवठेमहांकाळ) येथील दिघंची-हेरवाड राज्य मार्गावर असणार्या आरव बेकरी व जनरल स्टोअरमध्ये मंगळवारी पहाटे शॉर्टसर्किटने आग लागून झालेल्या नुकसानीत सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.स्थानिक ग्रामस्थ व अग्निशामक दलाच्या मदतीने सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणण्यात आली.
         याबाबत अधिक माहिती अशी की कुची (ता कवठेमहांकाळ) येथील प्रवीण पांडुरंग पाटील यांचे कुची गावातुन जाणाऱ्या दिघंची-हेरवाड या राज्य मार्गावर आरव बेकरी व जनरल स्टोअर हे दुकान आहे.ते रात्री सुमारे साडेनऊच्या सुमारास बेकरी बंद करून शेरीमळा येथील आपल्या घरी गेले असता.पहाटे सुमारे पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास बेकरी दुकानांमध्ये आग लागल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.
बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केले.स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने तेथे धाव घेत आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू केले.तोपर्यंत बेकरीतील फर्निचर,दोन फ्रीज,शैक्षणिक साहित्य,बेकरी साहित्य आगीच्या भक्ष्य स्थानी पडून बिचेराख झाले.
        घटनास्थळी कवठेमहांकाळ पोलीसासह सरपंच सहदेव गुरव,उपसरपंच जयसिंग पाटील यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली.तलाठी बी ए माने यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.प्रथमदर्शनी बेकरीतील साहित्य,फर्निचर,दोन फ्रिज,शैक्षणिक साहित्य या साहित्याचे सुमारे दहा ते बारा लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती प्रवीण पाटील यांनी दिली.नगरपंचायत कवठेमहांकाळ व नगरपरिषद तासगाव यांच्या अग्निशामक दलाने सदर आग विझवण्यास मदत केली.तासगांव नगरपरिषद अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी गोविंद सूर्यवंशी,लिडिंग फायरमन किशोर पवार,फायरमन वैभव मोरे,चालक पवन एडके यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून प्रवीण पाटील यांनी हा व्यवसाय सुरू केला होता.संपूर्ण बेकरीच आगीच्या भक्षस्थानी पडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
ग्रामस्थांनी नगरपंचायत कवठेमहांकाळ येथील अग्निशामक दलास संपर्क केला असता अग्निशामक दलाची गाडी उशिरा आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी दिसत होती.