NC Times

NC Times

बोरगावला 'भूजल समृद्ध गाव' पुरस्कार प्रदान,द्वितीय क्रमांकाचे तीस लाखाचे बक्षीस


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- 
महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अटल भूजल योजनेंतर्गत 'भूजल समृद्ध गाव' स्पर्धेत अगदी लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करुन समृद्ध झालेल्या बोरगाव (ता कवठेमहांकाळ) गावाला नाशिक येथे झालेल्या भरगच्च अश्या कार्यक्रमात राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भूसे व पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या संयुक्त हस्ते द्वितीय क्रमांकाचे रोख ३० लाखांचे बक्षीस व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.यावेळी खासदार भास्कर भगरे हेही उपस्थित होते.
     भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे होणारी भूजल पातळीची घसरण व त्यामुळे बाधीत होत असलेली गुणवत्ता थांबविण्यासाठी मागणी व पुरवठा व्यवस्थापन प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे सहभागी भूजल व्यवस्थापन विभागाने ही योजना सुरू केली आहे.
         लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करणे हा या योजनेचा मुख्य अजेंडा आहे.त्याकरीता ग्रामस्तरावर जल अंदाजपत्रक तयार करणे.भूजलाची तुट भरून काढणे,त्याकरिता केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचे अभिसरण करणे,ग्रामस्तरावरील भूजल उपल्ब्धतेत शाश्वतता साध्य करणे  हे या योजनेसाठीचे उद्दिष्ट होते.
        लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन हे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने अटल भूजल योजनेंतर्गत 'भूजल समृद्ध ग्राम' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या योजनेंतर्गत उत्कृष्ट सहभाग नोंदवून काम‌ करणार्या सन २०२२-२३ या पुरस्कारासाठी बोरगावची निवड करण्यात आली होती.त्यामध्ये त्यांनी द्वितीय क्रमांक मिळविला होता 
       सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील या योजनेत समाविष्ट १२ जिल्ह्यातील २७० ग्रामपंचायतींनी सदर स्पर्धेसाठी सहभाग घेतला होता.त्यामध्ये बोरगाव (ता कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतीने सहभाग घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला.नाशिक येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी होऊन बोरगाव ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाचे तीस लाखाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
       यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे व पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या संयुक्त हस्ते सरपंच सौ स्मिता नामदेव पाटील,उपसरपंच सुजित पाटील ग्रामसेवक सुधीर बनसोडे यांना सदर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री रमेश जाधव,वनिता माने, सरस्वती पवार, माजी उपसरपंच नामदेव पाटीलसह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी सदर पुरस्कार हा भूजल समृद्ध गाव योजनेसाठी संपूर्ण गावाने एकोप्याने व झपाटुन काम केल्यानेच हे यश मिळाल्याचे सरपंच स्मिता पाटील यांनी सांगितले.