NC Times

NC Times

जनकल्याण संवाद पदयात्रेचा दणकेबाज प्रारंभ जत तालुक्याचे नंदनवन करणार मा.तम्मनगौडा रविपाटील


नवचैतन्य टाईम्स जत (प्रतिनिधी)- 
जत तालुक्याचे नंदनवन करण्याचे स्वप्न उराशी बाळगून जनतेशी संवाद साधण्यासाठी पदयात्रा सुरू केली आहे, असे मत भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी जिरग्याळ, ता. जत येथील संवाद सभेत व्यक्त केले. 
तम्मनगौडा रवीपाटील यांच्या नेतृत्वाखाली जनकल्याण संवाद पदयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा आज बुधवारी खलाटी येथील श्री लखाबाई मंदिरात दणकेबाज प्रारंभ झाला. 
खलाटी ते मिरवाड व मिरवाड ते जिरग्याळ पदयात्रा काढण्यात आली. यावेळी पदयात्रा समितीचे अध्यक्ष व शिवसेना संपर्कप्रमुख निवृत्ती शिंदे सरकार, सरपंच परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष बसवराज पाटील, पाणी संघर्ष समितीचे नेते सुनिल पोतदार, भाजप नेते रामचंद्र पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष काम्मण्णा बंडगर, विजय पाटील, जिरग्याळचे सरपंच तानाजी पाटील, मिरवाडचे सरपंच पोपट सवदे, बाजचे माजी सरपंच संजय गडदे, पिरू कोळी, नरेंद्र कोळी उपस्थित होते. 
 तम्मनगौडा रवीपाटील म्हणाले की,  स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात जत तालुक्यात झालेल्या विकासाचा लेखाजोखा मांडण्यासाठी आपण जनकल्याण संवाद पदयात्रा काढली आहे. स्वतः एकशे सत्तर किलोमीटरहून अधिक प्रवास पायी केला आहे. या पदयात्रेतून हजारो माता भगिनींशी संवाद साधून आशीर्वाद घेतले आहेत. संपूर्ण तालुक्याचे प्रश्न समजावून घेत आहे. 
महिला व तरूणांच्या हाताला काम, शेतीला पाणी हा आपले प्रमुख उद्देश आहे. विशेषत महिला भगिनींसाठी २०० कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार आहे. महिलांसाठी सुरू असलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सुरू करण्यात आली असल्याचे रविपाटील यांनी सांगितले.
ही पदयात्रा डफळापुर, बेळुंखी, ते बाज असा पहिल्या दिवसाचा प्रवास करणार आहे. बाज येथे पहिल्या दिवशी मुक्काम करण्यात येणार आहे.
 दुसऱ्या दिवशी अंकले, डोरली,  हिवरे, कुंभारी. तिसऱ्या दिवशी कोसारी, कासलिंगवाडी वाळेखिंडी. चौथ्या दिवशी शेगाव, बनाळी, निगडी खुर्द, काराजनगी, कोळगिरी पाचव्या दिवशी सोरडी ते गुड्डापूर सांगता समारंभ होणार आहे. 
 ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रेचा पहिला टप्पा अफलातून यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.