NC Times

NC Times

कवठेमहांकाळ एसटी डेपो मध्ये "प्रवासी यात्रा दिवस" संपन्न,ग्राहकाच्या समस्यांचे जागेवर तोडगा


नवचैतन्य  टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे)-
     कवठेमहांकाळ आगारामध्ये 
 "प्रवासी यात्रा दिवसा'  निमित्ताने प्रवासीवर्गांची एसटीचे आधिकारी व कर्मचारीवर्ग यांच्या सोबत संयुक्त बैठक पार पडली.यावेळी तालुक्यातील विविध गावातील प्रवाश्यांनी आपल्या विविध समस्या बाबतची निवेदने अधिकार्यांना दिली. 
        यावेळी वाघोली (ता कवठेमहांकाळ) येथील सामाजिक कार्यकर्ते प्रतापराव शिंदे व तुकाराम शिंदे यांनी वाघोली येथील मुक्काम बस गाडी बंद पाडण्याच्या मार्गावर आली आहे.ती बंद करु नये कारण यामुळे चार गावातील विद्यार्थी व वयस्कर प्रवासी यांची गैरसोय होणार आहे.तसेच बाहेरगावी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना जाणारे जेवणाचे डबे कसे पोहच होणार या बाबतची समस्या मांडली.याबाबत उपस्थित सांगलीचे विभागीय वाहतूक नियंत्रक सुनिल भोकरे व डेपो अधिक्षक अमर निकम यांनी ही समस्या समजून घेऊन वाघोली मुक्काम गाडी कायमस्वरूपी चालू ठेवणेचा निर्णय घेतला.
         तसेच शेळकेवाडी गावातून रायवाडी-कवठेमहंकाळ,वाघोली- कवठेमहांकाळ या गाड्या नियमित आणि वेळेवर सोडण्यात याव्यात अश्या सुचना केल्या.त्याचबरोबर शेळकेवाडी येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या सर्व एसटी बसेस शेळकेवाडी येथील बसस्थानकवर थांबविणेत याव्यात ही समस्या मांडली.
        नागजचे सरपंच तानाजीराव शिंदे यांनी नागज गावासाठी सकाळी ८.३० वाजता व दुपारी ३ वाजता एसटी सोडण्यात यावी अशी मागणी केली.यावेळी कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील घाटनांद्रे,तिसंगी,गर्जेवाडी, कुंडलापूर,जाखापूर,जरंडी, शेळकेवाडी,नागज,रायवाडी येथील प्रवासी व पदाधिकार्यांनी जरंडी-कवठेमहंकाळ ही मुक्काम गाडी नियमित व कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची मागणी केली.यावेळी विविध भागातुन एसटीच्या समस्या बाबत आपली निवेदने अधिकार्यांना दिली.
       तसेच सदर सर्व समस्या बाबत आपण लवकरच तोडगा काढुन सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन कवठेमहांकाळ एसटी डेपोतील अधिकार्यांनी दिली.यावेळी वाघोलीचे तुकाराम शिंदे,प्रतापराव शिंदे,शेळकेवाडीचे रामदास सावंत,नागजचे सरपंच तानाजी शिंदे,रायवाडीचे सरपंच राजेश पडळकर,जाखापूरचे उपसरपंच अतुल पाटील, ऋतुराज पवार,दत्तात्रय आठवले, सुखदेव माळी आदीसह प्रवासीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.