NC Times

NC Times

!!लढा विचारांचा,माणुसकी जपण्याचा!! आजचा विचार- एक चांगला विचार अनेक दृष्ट वाईट विचारांना दूर करतो. प्रत्येक मानवाच्या भाव-भावनांचा, विचारांच्या पाप-पुण्याचा


नवचैतन्य टाईम्स वाई(ह.भ.प.प्रा.सौ.सरस्वती ताई भोसले-वाशिवले)
राम आठवां,थोडं पुण्य साठवा,
पुण्याईच्या  चेक घ्या खुशाल वठवा,
संगत करा तुम्ही साधु संतांची,
गोडी लागेल तुम्हां हरिनामाची,
नाही तूमचे कोणी ,हो नाही तूमचे कोणी ,ना तुम्ही कोणाचे !!
        खरे पाहता जर बँके मध्ये बॅलेन्स नसेल तर चेक भरूनही वठणार नाही ,तसेच सत्कर्म नसेल तर आपल्या पाप पुण्याच्या खात्याचा थोडा विचार करणे आवश्यक आहे पण मुळातच  पाप आणि पुण्य याची संकल्पना आधुनिकतेकडे झुकलेल्या माणसासाठी सांगणे गरजेचे वाटते, गरज आणि गरजा यामध्ये च माणूस आयुष्य भर अडकून राहतो ,व गरज पूर्ण करण्यासाठी पाप -पुण्य करतो,
☀️तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.☀️
प्रश्न : ‘पाप व पुण्य' या संबंधी जनमानसांत असलेले गैरसमज कोणते?
उत्तर :- चलनी नाणी वापरून इतकी गुळगुळीत होतात की, त्यांना व्यवहारात मोल राहत नाही.त्याचप्रमाणे पाप व पुण्य हे शब्द पुरातन काळापासून पुराण सांगणारे पुराणिक व इतर सामान्य लोक यांनी त्या दोन शब्दांचा इतका ढसाळपणे वापर केलेला आहे की,आज ते शब्द जवळ जवळ अर्थहीन झालेले आहेत.पाप-पुण्य या शब्दांचे अर्थ न समजताच बहुसंख्य लोक त्या शब्दांचा वापर करतात.कोणीही कशालाही पाप किंवा पुण्य समजतात.एकादशीचे दिवशी एकादशीचा उपास करणाऱ्या माणसाने जर त्या दिवशी चुकून कांदा खाल्ला तर त्याला आपण फार मोठे पाप केले असे वाटून तो अगदी व्याकूळ होतो.संकष्टी करणाऱ्या माणसाचा कांही कारणाने जर उपास मोडला तर आपल्या हातून फार मोठे पाप घडल्याने महासंकट येईल या भीतीने तो कष्टी होतो. गुरुचरित्राचे पारायण करतांना जर सोवळे बिघडले तर पाप लागून श्री दत्ताचा महाकोप होणार या भीतीने तो जर्जर होतो. घरातून बाहेर पडतांना देवाला नमस्कार करण्यास जर तो विसरला तर देव आपल्याला शिक्षा करणार म्हणजे आपल्यावर देवाचा कोप होणार असे वाटून तो व्यथित होतो.
एकदा गुरु केला की मग त्या गुरुला सोडून दुसऱ्या गुरुकडे जाणे म्हणजे महापाप असे कित्येक भोळसट व बावळट साधकांना वाटते,मग तो तथाकथित गुरु कितीही अडाणी, अज्ञानी,लोभी व लबाड असला तरी चालेल.तीर्थयात्रेचा नेम जर सोडला किंवा चुकला तर महापाप लागून संसारात संकटांचा ससेमिरा पाठीमागे लागेल,अशा कल्पनेने ग्रस्त व त्रस्त होणारे लोक थोडेथोडके नाहीत.याच्या उलट पुण्याच्या कल्पना पहा.चोऱ्या माऱ्या करणारा पण भिक्षा मागण्याचा जोड धंदा ( Side business ) करणाऱ्या भिकाऱ्याला एक रुपया दिला तर आपण फार मोठे पुण्य केले असे वाटते.दोन रुपयांचा हार देवाला घातला की, फार मोठे पुण्य संपादन केले असे वाटणारे पुष्कळ लोक आहेत. तीर्थात स्नान केल्याने सर्व पापे धुऊन जाऊन बहुत पुण्य मिळते अशा भ्रमात असणारे लोक थोडेथोडके नाहीत.अनवाणी भर उन्हात देवदर्शनाला जाण्याने महापुण्य मिळते या भ्रमात असणारे अनेक लोक आहेत. त्याचप्रमाणे अन्य धर्मियांचा द्वेष व तिरस्कार करणे म्हणजे पुण्य किंवा अन्य धर्मियांना मारणे म्हणजे पुण्य किंवा अन्य धर्मियांना धर्मांतर करण्यास प्रवृत्त करून स्वतःच्या धर्मात खेचून आणणे म्हणजे पुण्य,वगैरे आचरट गैरसमजुतीच्या आहारी गेल्यामुळे ‘पुण्य' या शुद्ध व दिव्य संकल्पनेचे विडंबन झालेले दिसून येते.याचे प्रमुख कारण असे की,पाप-पुण्य या संकल्पनांचा मूळ पायाच भुसभुशीत आहे.मुळात परमेश्वर ही संकल्पनाच चुकल्यामुळे एका बाजूने धर्म या शुद्ध संकल्पनेला तडा गेला व दुसऱ्या बाजूने संस्कृतीवर विपरीत परिणाम होऊन ती विकृतीकडे झुकली.या सर्व चुकीच्या गोष्टीमुळे पाप-पुण्याच्या कल्पनासुद्धा चुकीच्या झाल्या.परिणामी पापाला पुण्य व पुण्याला पाप समजेपर्यंत संस्कृतीची वाटचाल चुकीच्या दिशेने होत गेली. म्हणूनच जीवनविद्येचा खालील महत्त्वाचा सिध्दांत चिंतनीय आहे,
“'सत्कर्म' हाच धर्म व सत्कर्माचे आचरण करणे हेच धर्माचरण,जे केल्याने माणसाला अगणित पुण्याची प्राप्ती होते."
थोडक्यात पाप-पुण्याच्या अशा भ्रामक कल्पनांची लोकमानसात आज जी पकड आहे त्या सर्वांची यादी करायचे ठरविले तर मारुतीची लांबच लांब शेपूट तयार होण्यास वेळ लागणार नाही.येथे एक प्रश्न निर्माण होतो तो हा की पुण्य-पाप कशाला म्हणायचे? जे 'कर्म' कर्म करणाऱ्याला व इतरांना सुख देते ते पुण्य याच्या उलट जे 'कर्म' कर्म करणाऱ्याच्या व इतरांच्या दुःखाला कारणीभूत ठरते ते पाप होय धर्ममार्तंडांनी देवाधर्माच्या नांवाखाली जे कर्मकांड करण्यास शिकविले ते कर्मकांड पुण्यस्वरूप आहे की पापस्वरूप आहे हे,ते कर्मकांड करणाऱ्याच्या व इतरांच्या जीवनावर जे इष्ट किंवा अनिष्ट परिणाम करते त्यावर अवलंबून आहे.केवळ विधी म्हणून किंवा नियम म्हणून किंवा देवाच्या भीतीने किंवा धर्ममार्तंडांच्या दबावाखाली जे कर्मकांड केले जाते,ते कर्मकांड पुण्य निर्माण करण्यास समर्थ ठरत नाही.