NC Times

NC Times

जतमध्ये एल्गार; भूमिपुत्रच आमदार जनकल्याण पदयात्रेतून तम्मनगौडा रविपाटील यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन




नवचैतन्य टाईम्स जत (प्रतिनिधी)- 
जत तालुक्यात यावेळी भूमीपुत्रच आमदार झाला पाहिजे असा एल्गार जत तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी दिला‌. तम्मनगौडा रवीपाटील यांच्या ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रेच्या पहिल्या टप्प्याचा सांगता समारंभ जत शहरात झाला‌. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. ‌                                                            भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी काढलेल्या ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रेचा सांगता समारंभ जत शहरात माजी आमदार विलासराव जगताप यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी विलासराव जगताप म्हणाले की, जतची जागा रिक्त आहे. असे समजून बाहेरचे अनेकजण जतमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु यावेळी बाहेरचे पार्सल जतमध्ये चालणार नाही‌. जत तालुक्यातील भूमिपुत्रच आमदार झाला पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे‌. बाहेरचा उमेदवार लादण्याचा प्रयत्न केल्यास सर्वजण एकत्र येऊन जत तालुक्यातील भूमिपुत्र आमदार म्हणून निवडून आणू. 
कोणी जातीपातीचे राजकारण करू नये. आमची एकच जात उच्च व बाकीच्या जाती कमी असा अमंगळ भेदाभेद करू नये. आमदार होण्यासाठी सर्वच जाती धर्माच्या लोकांचा पाठिंबा आवश्यक असतो. जत तालुक्यात बाहेरून येऊन कोणी जातीचे विष पेरून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, 
गोपीचंद पडळकर यांना आमदार व्हायचे असेल तर त्यांची जन्मभूमी असलेल्या आटपाडी तालुक्यात का उभे राहत नाहीत. त्यांच्या तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येण्याची त्यांची पात्रता नाही. जतमध्ये येऊन काही फालतू लोकांच्या माध्यमातून खालच्या दर्जाची टीका आमच्यावर करत आहेत. गोपीचंद पडळकर यांची हिम्मत असेल तर त्यांनी स्वतः बोलावे, असे आव्हान विलासराव जगताप यांनी दिले. 
तम्मनगौडा रवीपाटील म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षात जत तालुक्याचा जो विकास खुंटला आहे. इथल्या शेतकरी, महिला युवकांच्या ज्या वेदना आहेत. त्या समजून घेण्यासाठी जत तालुक्यात तीनशे किलोमीटरची मी पदयात्रा करीत आहे. जत विधानसभेची निवडणूक निश्चितपणे लढवणार आहे. परीक्षा देण्यापूर्वी त्याची तयारी करणे हाच पदयात्रेचा हेतू आहे. तालुक्यातील युवकांच्या हाताला काम देणे, शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे, जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे हेच आपले ध्येय आहे. 
विद्यमान आमदारांनी जत तालुक्याला पाणी मिळाले नाही तर तीन वर्षात राजीनामा देतो‌. असे जाहीर केले होते‌. पाच वर्षांत केवळ दिशाभूल केली आहे. त्यांचा भाऊच मंत्री असताना जत तालुक्याचा त्यांनी काडीचाही विकास केला नाही. कडेगाव, पलूससारखी एक तरी संस्था जत तालुक्यात त्यांनी उभी केली का?,अशी टीका रवीपाटील यांनी केली.
जत नगर परिषदेचे माजी सभापती टीमूभाई एडके म्हणाले की, गोपीचंद पडळकर म्हणजे धनगर समाजाला लागलेली वाळवी आहे. जातीचे नाव घेऊन कोणी जत तालुक्यात राजकारण करू नये. धनगर समाज तम्मनगौडा रवीपाटील यांच्या पाठीशी ठाम आहे. यावेळी जत तालुक्यातीलच आमदार झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे.
यावेळी बसवराज पाटील म्हणाले की, तम्मणगौडा रवीपाटील हे एक होतकरू व तरुण समाजसेवक असून अशा समाजसेवा करण्याची इच्छा असणाऱ्यां उमेदवाराला माजी आमदार विलासराव जगताप यांनी पाठींबा द्यावा.
ऐतिहासिक जनकल्याण संवाद पदयात्रा शनिवारी सायंकाळी जत शहरात दाखल झाली. डोंगर निवासिनी श्री अंबाबाई, श्री यल्लमा देवी यांचे दर्शन करून वाचनालय चौकात दाखल झाली. त्या ठिकाणी श्री मल्लिकार्जुन देव, चिनगीबाबा यांचे दर्शन करून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन केले. वाद्यांच्या गजरात व फटाक्याच्या आतिशबाजीमध्ये शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. 
या पदयात्रेच्या पहिल्या टप्प्याचा सांगता समारंभ येथील बाजारपेठेतील मारूती ममंदिरासमोर झाला.
या सभेला ‌शिवसेना नेते व पदयात्रेचे प्रमुख संयोजक निवृत्ती शिंदे सरकार, जत तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष बसवराज पाटील, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत,उटगीचे नेते महांतेश पाटील, माडग्याळचे नेते महादेव माळ, मार्केट कमिटीचे माजी सभापती रमेश बिराजदार, दानम्मादेवी देवस्थानचे विश्वस्त सागर चंपान्नावर, डॉ ममता तेली, पाणी संघर्ष समितीचे नेते सुनील पोतदार,  आसंगी तुर्कचे सरपंच मिरासाहेब मुजावर, महादेव कलुती सावकार, माजी नगरसेवक टीमुभाई एडके,  हणमंत गडदे, कामण्णा बंडगर, सागर बिज्जरगी, सरपंच रामनींग निवर्गी, रामचंद्र पाटील पिरू कोळी,  उपस्थित होते.