NC Times

NC Times

ज्यांनी ज्यांनी पदयात्रा काढली ते आमदार, खासदार झालेत- माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील -यतनाळ


नवचैतन्य टाईम्स  जत (प्रतिनिधी)- 
देशात आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी पदयात्रा काढली ते आमदार, खासदार झाले आहेत. यावेळी जतमधून पदयात्रा काढणारे तम्मनगौडा रवीपाटील हे निश्चितपणे आमदार होतील, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री व विजयपूर येथील आमदार बसनगौडा पाटील-यतनाळ यांनी  बिळूर येथील संवाद सभेत बोलताना व्यक्त केले.
भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रविपाटील यांच्या ऐतिहासिक जनकल्याण संवाद यात्रेनिमित्त येथे जाहीर संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री बसनगौडा पाटील-यतनाळ हे उपस्थित होते. त्यावेळी
ककमरी मठाधिपती श्री गुरूलिंग जंगम स्वामीजी, राष्ट्रीय रस्ते सुरक्षा महामंडळाचे संचालक प्रसन्न आजरेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बसनगौडा पाटील म्हणाले की, आज पर्यंत ज्यांनी ज्यांनी पदयात्रा काढली आहे त्यांनी त्यांनी क्रांती केले आहे. तम्मनगौडा रवीपाटील यांची जनकल्याण संवाद यात्रा म्हणजे जत तालुक्यातील क्रांतीचे बीज आहे. अशा तरुण युवा नेत्याला विधानसभेत पाठवण्याची जबाबदारी जनतेवर आहे. त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी मी स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे शिफारस करणार आहे. तसेच स्वतः प्रचाराच्या मैदानात उतरणार आहे.
जत तालुक्याला पाणी देतो म्हणून कर्नाटकातील मंत्री एम बी पाटील व जतचे आमदार विक्रम सिंह सावंत यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना खेळवले आहे. जत तालुक्याच्या सीमावर्ती भागास पाणी देण्याच्या मागणीसाठी जनतेने कर्नाटक जाण्यासाठी आंदोलन केले होते. मात्र तम्मनगौडा रवीपाटील यांना तुम्ही आमदार करा, पाणी तर येईलच शिवाय जत तालुक्याचे नंदनवन होईल. 
तम्मनगौडा रवीपाटील म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षात जत तालुक्याचा विकास खुंटला आहे. इथल्या तरुणांना बेरोजगारांना व महिलांना काम देईल असा एकही कारखाना तालुक्यात उभारला नाही.  इथल्या शेतकऱ्यांच्या वेदना व दुःख अत्यंत तीव्र आहे. संवाद यात्रेच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेने अनेक प्रश्न मांडले आहेत. जत तालुक्याच्या समस्या निर्माण जाणून घेण्यासाठी एक भूमिपुत्र म्हणून आपण पायी प्रवास करीत आहे.
गुरुलिंग जंगम स्वामीजी यांनीही यावेळी आशीर्वाद दिले. यावेळी बसवसेना अध्यक्ष बसवराज पाटील यांनी जत तालुक्याचा विकास करण्याच्या दृष्टीने तम्मणगौडा रवीपाटील प्रयत्न करत असल्याचे सांगून यासाठीच तम्मणगौडा आणि बसणगौडा एकत्र आल्याचे सांगितले.
ऐतिहासिक जनकल्याण संवाद यात्रा बसर्गीहून आज शुक्रवारी सायंकाळी बिळूर येथे दाखल झाली. त्यावेळी बिळूर ग्रामस्थांनी पदयात्रेचे अत्यंत जल्लोषात स्वागत केले. वाद्यांच्या गजरात व फटाक्याच्या आतिशबाजीमध्ये गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या पदयात्रेचे येथील काळभैरवनाथ मंदिरासमोर संवाद सभेत रूपांतर झाले.
या सभेला ‌माजी जिल्हा परिषद सदस्य रामन्ना जीवन्नावर, बी. एस. घेज्जी, शिवसेना नेते निवृत्ती शिंदे सरकार, पाणी संघर्ष समितीचे नेते सुनिल पोतदार, माजी सरपंच नागनगौडा पाटील, महादेव कलुती, माजी नगरसेवक टीमुभाई एडके, हणमंत गडदे, कामण्णा बंडगर, सागर बिज्जरगी, सरपंच रामनींग निवर्गी, रामचंद्र पाटील, श्रीशैल कोटगोंड, मल्लिकार्जुन कोटगोंड, पिरू कोळी,  उपस्थित होते.

 बसनगौडा पाटील-यतनाळ यांच्या संवाद सभेला बिळूर येथे प्रचंड गर्दी झाली होती. जय श्रीराम च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. तर तम्मनगौडा रवीपाटील युथ फाऊंडेशन यांच्यावतीने सुमारे 2000 महिलांना रक्षाबंधन भेट म्हणून साड्यांचे वाटप करण्यात आले.


 
पदयात्रा सांगता सभेला पुन्हा येणार: बसनगौडा पाटील
जन कल्याण संवाद पदयात्रेच्या सांगता सभा कधी आहे. ते सांगा त्या सभेला आपण पुन्हा येणार असल्याचे माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील यांनी सांगितले.