NC Times

NC Times

खरिपातील पेरणीतून ज्वारी होत चालली हद्दपार,ज्वारी पेऱ्याकडे दुर्लक्ष,मात्र भाकरीला वाढती मागणी


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/(जालिंदर शिंदे):- पिकविले तर त्याला भाव मिळेलच याची कोणतीही शाश्वती नाही.त्यात काढणीसाठी मजुराची नकारघंटा,कापणी,खुडणी केली तर अंगाला खाज सुटते अश्या मजूरांच्या तक्रारी,सोबतच काढणीच्या वेळेस जर पाऊस आलाच तर तीच ज्वारी काळी पडून मातीमोल दराने विकावी लागते.याच कारणामुळे गेल्या काही वर्षापासुन खरिपातील ज्वारीच्या पेरणीत मोठी घट झाल्याचे विदारक चित्र कवठेमहांकाळ तालुक्यात दिसत आहे.
          मागचा काळ आठवून बघीतला तर कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक पेरा हा ज्वारीचाच होत होता.गावागावातील शेतकर्यांच्या घरात ज्वारीच्या पोत्यांच्या राशीच्या राशी दिसून येत होत्या.काही ठिकाणी तर जमिनीतच खोल खड्डा करून प्लास्टिकरुपी आवरणातून त्याची 'पेवा'तून ज्वारीची साठवणूक केली जात होती.आर्थिक अडचण आल्यास किंवा पेरणीच्या वेळी हीच साठवणूक केलेली ज्वारी मार्केटला विक्रीला नेऊन शेतकरी आपली गरज भागवत होते.
      पण सध्या काळ बदलला आहे.संकरितचा जमाना आला आहे.लोक खरीपातसुध्दा नगदी  उडीद,सोयाबीन,भुईमुग,मका पिकासह द्राक्षा सारख्या इतर फळ शेतीकडे वळले आहेत.शेतकर्यांनी ज्वारी सोडून इतर पिकाकडेच आपला मोर्च्या नेत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.कधीकाळी तालुक्यात हजारो हेक्टर पेरणी होत असलेली ज्वारी सन २०२४-२५ च्या खरीप हंगामात एकुन २४३८७ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र हे ३०१३ हेक्टर इतके आहे. या २०२४-२०२५ चालू खरीप हंगामात ज्वारी केवळ ४२६ हेक्टरवर पेरल्या गेल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
      सद्या आहारात ज्वारीचे महत्त्व वाढले आहे.ज्वारीची भाकरी खाणाऱ्यामध्येही मोठी भर पडली आहे.भाकरीला मध्यमवर्गीय,श्रीमंताच्या जेवणात मानाचे अनन्यसाधारण स्थान मिळत आहे.असे असतांना देखील शेतकऱ्यांना बाजारपेठेत त्यासाठी योग्य भाव मिळत नसल्याने ज्वारीची सरासरी एवढीही पेरणी होऊ शकत नाही.मजुराची अडचण,काढणीच्या वेळेस पाऊस झाला तर ज्वारी काळी पडण्याची भीती या व अशा अनेक कारणांमुळे खरीपातील ज्वारी पीक हे हद्दपार होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
 कवठेमहांकाळ तालुक्याचे पेरणी क्षेत्र एकूण २४३८७ हेक्टर इतके असून त्यापैकी केवळ ४२६ हेक्टरवर यावर्षी संकरित ज्वारीची पेरणी झालेली आहे.कधीकाळी तालुक्यात सर्वाधिक पेरणी ही ज्वारीची असायची,तो पेरा कमालीचा घटला आहे.आता मात्र कुठे रब्बीमध्ये या ज्वारीला शेतकरी पसंती देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
(प्रतिक्रिया :- 
 "खरिपात हायब्रीड ज्वारी घेतल्यास धांन्यासोबत कडबा पण मिळतो,मात्र गेल्या काही वर्षापासून या पिकावर खरिपात रोगाचा व अळ्याचा मोठा प्रादुर्भाव होत आहे.पिकाची कापणी करतांना अंगाला खाज येत असल्याने मजूर मिळत नाही.कापणीच्या वेळेस पाऊस आला तर ज्वारी खराब होते.म्हणून शेतकरी खरीप ज्वारी पीक पेरणीकडे कानाडोळा करतात.उलट रब्बीत ज्वारी घेण्याचा प्रयोग काही प्रमाणात यशस्वी होत आहे.
   --- प्रल्हाद (बापू) हाक्के
            शेतकरी/गर्जेवाडी.)