NC Times

NC Times

रवीपाटलांच्या नेतृत्वाखाली तीनशे कि.मी जनकल्याण संवाद पदयात्रा आयोजन निवृत्ती शिंदे, टिमुभाई एडके बसवराज पाटील यांची माहिती


नवचैतन्य टाईम्स माडग्याळ / वार्ताहर(विजय चौगुले)-
  भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यात तब्बल तीनशे किलोमीटरची जनकल्याण संवाद पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती, यात्रेचे संयोजक निवृत्ती शिंदे-सरकार,  सरपंच परिषदेचे जत तालुका माजी अध्यक्ष बसवराज पाटील व जत नगरपरिषदेचे माजी सभापती टीमूभाई एडके यांनी पत्रकार बैठकीत दिली. 
निवृत्ती शिंदे सरकार म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षात जत तालुका मागास का राहिला? या विषयाचे मंथन व तालुक्या च्या विकासावर जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा दोन टप्प्यात करण्यात येणार असून पहिल्या टप्प्याचा शुभारंभ दि.  28 जुलै रोजी उमदी येथून होणार आहे. पहिल्या टप्प्यात सहा ठिकाणी मुक्काम करून सातव्या दिवशी पदयात्रा जत शहरात पोहोचेल. तेथे भव्य सांगता समारंभ होणार आहे. 
पहिला टप्पा दीडशे किलोमीटरचा आहे . हे अंतर स्वतः  तम्मनगौडा रवीपाटील पायी चालणार आहेत . ते थेट शेतकरी,  कष्टकरी, युवक, महिला भगिनी, शालेय विद्यार्थी यांची भेट घेऊन जत तालुक्याच्या विविध प्रश्नावर  संवाद साधणार आहेत.
उमदी, हळ्ळी, बालगाव, बोर्गी, मोरबगी, जालिहाळ बुद्रुक, तिकोंडी, संख, लमाणतांडा, दरीबडची, मुचंडी, रावळगुंडवाडी, उंटवाडी, मेंढिगिरी, खोजनवाडी, उमराणी, सिंदूर, बसर्गी, गुगवाड, वज्रवाड, एकुंडी, जिरग्याळ, बिळूर, येळदरी, असा जनकल्याण संवाद पदयात्रेचा मार्ग आहे.
बसवराज पाटील म्हणाले की, जत तालुक्याचा विकास खुंटण्यामध्ये औद्योगिक विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. जत तालुक्यातील जनतेचे प्रश्न थेट विचारून तालुक्याचा औद्योगिक, कृषी, शैक्षणिक, आरोग्य, रोजगार व सामाजिक विकास करण्याच्यादृष्टीने पुढील पाच वर्षात एक ठोस आराखडा तयार करण्यात येणार आहे.  शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करून जत तालुक्याचे नंदनवन करण्याचा मानस तम्मनगौडा रवीपाटील यांचा आहे. तालुक्याचे संपूर्ण चित्र पालटण्यासाठी भविष्यातील विकास योजनांची ब्लू प्रिंट बनवण्यात येणार आहे. त्यासाठी जनकल्याण संवाद यात्रा अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.
टिमूभाई एडके म्हणाले की, जत तालुक्याचा पाणीप्रश्न, तालुक्याचे त्रिभाजन, जत शहरातील क्रीडांगणाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नामकरण, अहिल्यादेवी स्मारक, महात्मा बसवेश्वर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची निर्मिती हा आपला अजेंडा आहे. तालुक्यातील युवक युवती व महिलांसाठी जिल्हा परिषद गटवार उद्योगधंद्यांची निर्मिती असे अनेक प्रश्न भविष्यात  तम्मनगौडा रवीपाटील यांच्या नेतृत्वाखाली सोडवण्यात येतील. त्यासाठी ही जनकल्याण संवाद पदयात्रा करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व बांधवांनी या यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.