NC Times

NC Times

पूरपातळीची माहिती देताना महापालिकेचा गलथानपणा चौकशी करून कारवाई करणार – पालकमंत्री सुरेश(भाऊ)खाडे


नवचैतन्य टाईम्स सांगली (प्रतिनिधी)- सांगली महापूराची धास्ती मनात असताना नदीतील पाणी पातळीबाबतची माहिती देत असताना महापालिकेच्या अधिकार्‍यांचा गलथान कारभार गुरूवारी समोर आला. या प्रकाराची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात येईल असे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सतत पडत असलेला पाऊस आणि धरणातून सोडण्यात आलेले पाणी यामुळे महापूराचे संकट वेशीवर आले असताना लोकांना सजग करण्यासाठी आणि अद्यावत माहिती देण्यासाठी महापालिकेने २४ तास कार्यरत वॉररूम कार्यरत केली आहे. या ठिकाणाहून महापालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून माध्यमांना वेगवेगळ्या ठिकाणची पाणीपातळी तासा-तासाला कळविण्यात येते. मात्र, पहाटे पाच वाजेपर्यंंत मिरजेतील कृष्णाघाट येथे इशारा पातळी ४५ फूट असल्याचे सांगण्यात येत होते. अचानकपणे पहाटे पाच वाजता इशारा पातळी ४८ फूट असल्याचे सांगण्यात आले. यामुळे गोंधळ माजला. याबाबत विचारणा होताच सकाळी आठनंतर पुन्हा इशारा पातळी ४५ फूट असल्याचे सांगण्यात आले.
या माहितीच्या या गोंधळाबाबत पालकमंत्री खाडे यांना विचारले असता असे होणार नाही, मात्र याची चौकशी केली जाईल, या गोंधळाला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. दरम्यान, महापूराच्या काळात वाहून जाणारे पाण्याने दुष्काळी भागातील तलाव भरून घेण्यासाठी ताकारी, म्हैसाळ, टेंभू या सिंचना योजना चालू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पालकमंत्री खाडे यांनी सांगितले. या योजनेतून कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी, खानापूर, जत, सांगोला, मंगळवेढा या तालुक्यातील साठवण तलाव भरून घेण्यात येतील असेही ते म्हणाले.