NC Times

NC Times

परफेक्ट इंग्लिश मेडीयम स्कूल कुची येथे साकारली बाल पंढरी


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- आषाढी एकादशीचे औचित्य साधून परफेक्ट इंग्लिश मिडीयम स्कूल कुची (ता कवठेमहांकाळ) च्या विद्यार्थ्यांनी गावात साधुसंताची व वारकऱ्याची  वेशभूषा करून जणू मिनी पंढरीच साकारली होती.शाळेच्या प्रांगणासह गावात या बालचमूंनी आपल्या वेषभूषेद्वारे उपस्थितांना चांगलेच पंढरीचे दर्शनच घडवले होते.
 हे छोटे वारकरी विठ्ठल-रूक्मिणी,संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत नामदेव अशा संतांची वेशभूषा करुन त्यांनी जणू साधुसंताचा मेळाच जमल्याचे चित्र निर्माण केले होते.त्याला गावकऱ्यांच्या कडूनही 'राम कृष्ण हरी' म्हणून चांगलीच दाद देली जात होती. 
आषाढी एकादशी दिंडी सोहळ्याच्या या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी,वारकरी दिंडी मोठ्या दिमाखात काढली.चिमुकल्यांनी भक्तीगीते,नृत्य,फुगडी,टाळ, मनोरे,गोल रिंगण असे धार्मिक कार्यक्रम सादर केल्याने परिसराचे वातावरण मोठे भक्तिमय झाले होते.
शेवटी शाळेमध्ये दिंडीच्या आगमनानंतर पांडुरंगाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.दिंडीमधून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीय संस्कृती,संस्कृतीचा वारसा व वारीचे महात्म्य जोपासण्यासाठी व समजण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.दिंडी सोहळ्यासाठी ज्ञान माऊली शिक्षण संस्थेचे चेअरमन धनंजय शिंदे,सचिव नानासाहेब पाटील, संचालक वसंत पवार,  प्रिन्सिपल,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालकवर्ग, विद्यार्थी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेविषयी मनामध्ये आपुलकी व प्रेम असणारे पालक योगेश फाकडे, उमेश फाकडे व त्यांच्या सहकारी मित्र मंडळीनी सर्वांना शाळेमध्ये मसाले दुधाचे वाटप केले.त्याबद्दल शाळेच्या व संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानले गेले.शेवटी धनंजय शिंदे यांनी आभार मानले.