NC Times

NC Times

साताऱ्यात मुसळधार पावसाने काही गावांचा संपर्क तुटला,पावसाने जनजीवन विस्कळीत


नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)- सातारा  जिल्ह्यात बुधवार दुपार पासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे छोटे पूल साकव वाहून गेल्याने दुर्गम डोंगराळ भागातील गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांत दरडी कोसळल्या आहेत. सखल भागात पाणी साठले आहे. या पाण्यामुळे ओढे नाले भरभरून वाहत आहेत. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्याने शाळांना गुरुवारी सुट्टया जाहीर केल्या आहेत. मांढरदेवी येथे मुसळधार पाऊस कोसळत असून मांढरदेव भोर हा रस्ता बंद करण्यात आल्याने वाहतूक वाई मार्गे सुरू आहे.
सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला असून नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्वसामान्य माणसांची कोणत्याही स्थितीत गैरसोय होणार नाही यासाठी यंत्रणांनी सर्वतोपरी खबरदारी घ्यावी. दरड प्रवण क्षेत्र, भूस्खलन बाधीत क्षेत्र या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे त्वरीत स्थलांतर करण्यात यावे. पुढील तिन दिवस अतिवृष्टीचे वर्तविण्यात आले असून यंत्रणांनी २४तास सतर्क रहावे. कोणत्याही स्थितीत नागरिकांच्या जीवाला सर्वोच्च प्राधन्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
पावसाने जिल्ह्यातील विविध धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असून, मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून, नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास एनडीआरएफ व इतर आपत्तीजनक पथकासह जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर डोंगर वाहून आल्याने त्या मार्गावर वाहतूक बंद झाली आहे. वाई तालुक्यात धोम धरणाखालील भागात जोरदार पाऊस असल्याने ओढे नालेभरून वाहत असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
महाबळेश्वर तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक ३३०.१० मिमी (१२.९९६ इंच)पाऊस झाला असून लिंगमळा धबधबा पर्यटन प्रशासनाने बंद केला आहे.पाचगणी येथेही जोरदार पाऊस सुरु आहे.मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर मधील लिंगमळा धबधबा आणि अनेक पॉइंट्स बंद करण्यात आले आहेत.प्रशासनाकडून धोकादायक ठिकाणी पर्यटन बंदी करण्यात आली आहे.
कण्हेर धारण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने कण्हेर धरणाचे चार ही दरवाजे उघडले असून वेण्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. गोवे (ता सातारा) येथे श्री कोटेश्वर मंदिर येथील जुना पुल कृष्णा नदीच्या पाण्याखाली गेला असून बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केला आहे. शेजारील नवीन पुलावरून वाहतूक सुरळीत आहे. जुन्या पुलावर पाणी असेपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद केले असून कोणीही मंदिरात दर्शनासाठी जावू नये, असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
जांभळी (ता वाई)येथील पुलावरून पावसाचे पाणी वहात आहे. मुसळधार पावसामुळे वाई तालुक्यातील दुर्गम गावांचा संपर्क तुटला आहे. ओढ्याचे पाणी वाढल्याने तीन साकव दोन वर्षांपूर्वी नुसते भराव टाकून केले होते त्यावरून पाणी गेले आहे.त्यामुळे येथील गावे संपर्कहीन झाली आहेत. जिल्ह्यात संततधार पावसाने धरणांची खालावलेली पाणीपातळी वाढण्यास सुरुवात झाली आहे.धोम,धोम बलकवडी, धरणांच्या पाणी पातळी वाढली आहे. सातारा, जावळी, महाबळेश्वर व सातारा तालुक्यातील दुर्गम भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने आपत्ती व्यवस्थापनही नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी सज्ज झाले आहे. दरडी कोसळण्याच्या मार्गावरील गाचे व पूरपरिस्थिती उद्भविण्याची शक्यता असणाऱ्या गावांमधील ग्रामसेवक व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील नदी, नाले, ओढेही पाण्याने भरून वाहत आहेत. हवामान खात्यानेही पुढील चोवीस तासांत सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात सरासरी दि. २५ जुलै रोजी ५३.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दि १ जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी ५९२.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण १०८.६८अब्ज घन फूट (टिएमसी)पाणी साठा आहे.
वाई किवरा ओढा येथून शिल्पा प्रकाश धनवडे (वय ४७) ही रविवार पेठेतील महिला वाहून गेली. कण्हेर धरणातून थोड्या वेळात सात हजार वरून दहा क्युसेक्स विसर्ग वेण्णा नदीत वाढविण्यात येणार आहे