NC Times

NC Times

घाटमाथ्यावर बेंदूर सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात संपन्न


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे /वार्ताहर(जालिंदर शिंदे):-शेतकऱ्यांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असणारा बैलपोळा अर्थात बेंदूर हा सण घाटमाथ्यावरील घाटनांद्रे        तिसंगी,वाघोली,गर्जेवाडी,कुंडलापुर,जाखापुर व कुची         परिसरात पारंपरिक पद्धतीने पण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.अगदी सकाळ पासूनच  बळीराजा  मध्ये या सणाची लगबग दिसून येत होती.त्यातच दुष्काळामुळे व यांत्रिकीकरणाच्या अतिवापरामुळे बैलांची संख्याच रोडावल्याने पुजेसाठी चिखल मातीच्या बैलांचा आधार घेतला जात होता. 
शुक्रवारी सकाळी बळीराजाने दावणीला असणाऱ्या बैलासह इतर सर्वच जनावरांना धुऊन,त्यांची शिंगे रंगवून सजावट केली.विशेषतः बळीराजाला शेती कामासाठी मदत करणार्या बैलाप्रती अस्था व्यक्त करताना त्याला धुऊन,पुसुन त्यांचे खांदे मळण्यात आले तदनंतर शिंगे रंगवून त्याला बेगड लावण्यात आली.त्याचबरोबर त्याला नवीन कंडा,घुंगराची माळ,नवीन दोर, शिंगाटे लावून व पाठीवर झूल चढविण्यात आली होती.घरातील स्त्रियांनीही बैलांची विधिवत पुजा करून गोड नैवेद्य देण्यात आला. 
 सांयकाळी चार नंतर बैलांची गावातील प्रमुख मार्गावरून सुवाद्यसह मिरवणूक काढण्यात आली.याला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला होता.आजच्या दिवशी बळीराजा बैलाप्रती मोठी अस्था व्यक्त करताना त्याला कोणतेही काम लावले जात नाही.