NC Times

NC Times

लाडकी बहीण' योजनेने इतर व्यवसाय धंदे तेजीत


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे) :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर झाली तेव्हापासून महिला शेतीतील कामधंदा सोडून या योजनेकरिता लागणारी कागदपत्रे जमा करण्यातच व्यस्त झाल्या आहेत. त्यांच्याबरोबर कारभाऱ्यांनासुद्धा या कामाला त्यांनी लावले आहे.
 जिथं बघावं तिथं महिला हातात कागदपत्रे घेऊन वणवण फिरताना दिसून येत आहेत. गावातून पोलिस पाटील,सरपंच यांची सही घेतली की थेट तहसीलकडे मोर्चा वळवित असल्याने एसटी बस,खासगी वाहतुकीला गर्दी होताना दिसत असून,खासगी वाहनधारकांचाही व्यवसाय सध्या तेजीत चालला आहे.त्याचबरोबर झेरॉक्स सेंटरला तर चांगलेच सुगीचे दिवस आले आहेत.दलालांची तर पोळीच पिकली आहे.हॉटेल,फळविक्रेते यांच्या व्यवसायातही वृद्धी झाली आहे.
सध्या शेतीकामाची लगबग सुरू आहे.कुळवणे,खुरपणी,खत टाकणे आदी कामे सुरू आहेत; परंतु ही योजना सुरू झाली तेव्हापासून मजूरवर्ग याच कामात व्यस्त असल्याने शेतीकामासाठी मजूरांचा मोठा तुटवडा भासत आहे.
 डोमासाईल,उत्पन्नाचा दाखला ही अट शिथिल केल्याने गर्दी थंडावली आहे.सदर योजनेकरिता कागदपत्रे जुळवताना महिलांची मोठी दमछाक होत असल्याचे शासनाच्या लक्षात आल्याने तहसीलमधून निघणारे डोमेसाईल,उत्पन्नाचा दाखला यात शिथिलता आली आहे.
ज्यांच्याकडे पिवळे व केशरी शिधापत्रिका आहे,अशांना उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करण्यात आली.ज्यांच्याकडे १५ वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड,जन्माचा दाखला आहे अशांना डोमेसाईलची अटही रद्द करण्यात आली आहे.त्यामुळे थोडा फार दिलासा मिळाला आहे.