NC Times

NC Times

'लाडकी बहिण ... ही लबाडकीची योजना न ठरावी मुख्यमंत्री साहेब,एक बहिण मायेची तर दुसरी भटकंतीची बहीण वाऱ्यावर नसावी..!




नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर/(जालिंदर शिंदे):- राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना अमलात आणली आहे.या योजनेसाठी सुरुवातीला अनेक किचकट अटी लावण्यात आल्या होत्या.या अटी अतिशय जाचक असल्याचे लक्षात आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात बदल करून अनेक जाचक असणारे नियम व अटी शिथिल केल्या व या योजनेची मुदत देखील वाढवली. मात्र या योजना सर्वच लाभार्थ्यापर्यंत पोहोचवल्या जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची दखल राज्य सरकारने घेतली नसल्याने 'लाडकी बहीण योजना' ही लबाडकीची योजना ठरू नये असे म्हणण्याची वेळ सध्या आली आहे.
 याचे कारण असे की धनगर,पारधी,ठेलारी, डवरी,अश्या समाजातील कुटुंबे ही आपला व्यवसाय करताना फिरस्तीवर असतात.यांच्यासह अजून इतर देखील काही भटक्या विमुक्त जातीच्या नागरिकांची देखील पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती सुरू असते.या महिलांना ही योजना सुरू झाली आहे हे सुद्धा माहिती नाही.तर या महिला कागदपत्रे जमा कधी करतील व या योजनेचा लाभ त्यांना कसा मिळेल असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.यामुळे राज्य सरकारने भटकंती करणाऱ्या महिलांना देखील ही योजना कशी पुरवता येईल याबाबत उपाययोजना करणे अगदी अपेक्षित बनले आहे.
 राज्यातील सर्व महिला या माझ्या बहिणी आहेत आणि त्यांच्यासाठी मी ही योजना सुरू केली आहे असे विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठसुन जाहीर केले.पण त्याला वयाची अट एकवीस ते पासष्ट वर्षा पर्यंतची घातली आहे. पासष्टवरील महीला काय आपल्या बहीणी नव्हेत काय  ? हाही प्रश्न सध्या पुढे येत आहे.पासष्ट वर्षावरील महिलांच्या पुढे तर खूप अडचणी आहेत व आसतात हे मुख्यमंत्री असणाऱ्या भावाला कोण पटवून देणार.
 लाडकी बहीण ही योजना जेव्हा सुरू करण्यात आली.ज्या दिवशी याची घोषणा झाली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून राज्यातील लाडक्या बहिणींची कागदपत्रांची जुळवाजुळ करण्यासाठी मोठी धावपळ सुरू झाली आहे.या धावपळीत महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.तर अनेक ठिकाणी महिलांना अनेक अडीअडचणींशी सामना करावा लागला.ऑनलाईन सर्हीस सेंटर येथे तर खूप गर्दी आणि अर्थीक लुटही होत होती.हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट घोषणा करून सांगितले की एकही रुपया कोणी घेतला तर अशा सेंटरवर थेट कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.काही तक्रार असल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन देखील राज्य सरकार तर्फे करण्यात आले आहे.
 मुळात ही योजना राज्यातील २१ ते ६५ वर्ष वय असणाऱ्या महिलांसाठी लागू करण्यात आली आहे.यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमात बसणाऱ्या सर्व महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट खात्यावर जमा होणार आहेत.हा निर्णय अगदी स्वागत करणारा असला तरी धनगर,पारधी,डवरी व ठेलारी समाजासह इतर भटक्या विमुक्त जातीच्या महिलांना अशी काही योजना सुरू झाली असून या योजनेसाठी काय करायचे हे देखील त्यांना माहिती नाही.अशा महिलांसाठी राज्य सरकारने उपयोजना करून या बहिणींना देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.या सगळ्या बाबी बघता लाडकी बहीण योजना लबडकीची ठरू नये मुख्यमंत्री साहेब.एक बहीण मायेची तर दुसरी भटकंतीची बहीण वाऱ्यावर नसावी म्हणणेच योग्य ठरेल. 
 
धनगर,पारधी,डवरी व ठेलारी समाजासह भटक्या विमुक्त जातीसाठी विशेष उपाययोजना कराव्यात. धनगर व ठेलारी समाजातील महिला तसेच इतर भटक्या विमुक्त जातीच्या महिलांनाही या प्रवाहात आणणे गरजेचे आहे.त्याचबरोबर पासष्ट वर्षावरील महिलांना या योजनेपासून वंचित ठेवण्याचा उद्योग सुरू आहे.मग त्या काय आपल्या बहीणी नव्हेत काय ? याबाबत विचार होणे मोठे गरजेचे आहे
       --- प्रा दादासाहेब ढेरे
               कवठेमहांकाळ