NC Times

NC Times

फुलांचे हार सुवासिनींकडून औक्षण अन् गाव जेवण शेतकऱ्याने घातले चक्क गाईचे डोहाळे


नवचैतन्य टाईम्स नागज प्रतिनिधी(हणमंत देशमुख)- तुम्ही डोहाळे जेवणा विषयी अनेकदा ऐकलं आणि पाहिलंही असेल. पण कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज गावातील डोहाळे जेवणाची चर्चा चांगलीच रंगली आहे. ही चर्चा आहे एका गायीच्या डोहाळे जेवणाची…  
मुक्या प्राण्यांवर कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम करणारी अनेक कुटुंबे आहेत. परंतु त्या मुक्या प्राण्यांनाही भावना असतात, त्यांचे सुद्धा सुखाचे क्षण हे कार्यक्रम करून साजरे करावेत ही भावना जाणून कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज येथील शेतकरी बाळू भिमराव शिंदे यांच्या  गाईच्या डोहाळे जेवणाचा सोहळा पार पाडला.हिंदू धर्मात गाईला देव मानले जाते. नागज येथील बाळू शिंदे यांच्याकडे एक देशी गाय आहे. तिची देखभाल शिंदे कुटुंबीय घरातील सदस्याप्रमाणे करत असतात. ही गाय सात महिन्याची गरोदर असून त्याचे औचित्य साधून शिंदे कुटुंबाने  घरगुती पध्दतीने गाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पाडला.या आगळ्यावेगळ्या डोहाळे जेवणासाठी गाईला आकर्षकरीत्या सजवण्यात आले होते. तर फराळाचे सर्व साहित्य व गाईला साडी चोळी हारतुऱ्यानी सजवून पुरणपोळीचे जेवण करण्यात आले होते. शिंदे परिवातील सर्व सुवासिनीच्या कडून परंपरेनुसार गाईची ओटी भरून कार्यक्रम पार पाडला. या अनोख्या कार्यक्रमाचे नागज गावात कौतुक होत आहे.