NC Times

NC Times

लाडकी बहीण योजनेच्या नादात शेतकऱ्याला पिक विमा भरण्याचा पडला विसर


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर/जालिंदर शिंदे :-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांना महिन्याला पंधराशे रुपये देणाऱ्या  'लाडकी बहीण'  या योजनेची घोषणा केली आहे.त्यामुळे गावागावात घराघरातील महिला व पुरुष या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्राची जमवाजमव करताना दिसत आहेत.मात्र 'लाडकी बहीण'  योजनेच्या नादात मात्र पीक विम्याची अंतिम तारीख जवळ येत असून ही पिक विमा भरण्याचा शेतकऱ्यांना चांगलाच विसर पडल्याच चित्र सध्या दिसत आहे.
      राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये विविध नवीन योजनांची घोषणा केली आहे.त्यामध्ये प्रामुख्याने  'लाडकी बहीण'  योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.या योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची जमवाजमव करतांना महिलांच्या बरोबर पुरुषांची देखील चांगलीच दमछाक होत आहे.त्यामुळे ते यामध्येच व्यस्त दिसत आहेत. 'लाडकी बहीण'  योजनेच्या नादात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्या खरिपाचा पिक विमा भरण्याचा मोठा विसर पडला की काय असं चित्र दिसून येत आहे.
        प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा विमा भरण्याची अंतिम तारीख १५ जुलै आहे.सरकारच्या वतीने शेतकऱ्यांचा एक रुपयांमध्ये पिक विमा काढला जात आहे.कवठेमहांकाळ तालुक्यात ४० टक्केच शेतकऱ्यांनी अद्याप पिक विमा भरला आहे.विमा भरण्याची मुदत केवळ पाच दिवसच राहीलेली आहे.माञ ऑनलाइन केंद्रावर शेतकरी पिक विमा भरताना शेतकरी फारच कमी दिसत आहेत.पूर्वानुभव लक्षात घेता कवठेमहांकाळ तालुक्यासाठी नेहमीच वरुणराजाची वक्रदृष्टी राहीली आहे.हा तालुका सततच्या दुष्काळाने चांगलाच बेजार झाला आहे.कायमच दुष्काळाला समोर जावे लागले आहे.त्यामुळे या तालुक्या करिता पीक विमा भरणे तसे गरजेचेच आहे.काही भागात जलसिंचन योजनेचे काम झाले आहेत.पण या योजना नेहमीच बेभरवशाच्या ठरल्या आहेत. 
महिलांची लुट थांबण्यासाठी प्रत्येक गावात मदत केंद्र उभारणे गरजेचे
 'लाडकी बहीण'  योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांना मार्गदर्शनाची गरज आहे.अर्ज कुठे भरायचा कसा भरायचा कागदपत्र कोणती लागणार आहेत या संभ्रमात महिला इत्रत फिरताना दिसत आहेत.तरी अर्ज भरण्यासंदर्भात सखोल माहिती देण्यासाठी व अर्ज भरता वेळी त्यांची आर्थिक लुट होणार नाही याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक गावामध्ये महिलांसाठी सरकारच्या वतीने मदत केद्र सुरू करण्याची गरज आहे.किवा आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून जनजागृती करण्याची गरज आहे.