NC Times

NC Times

अण्णा हजारेंच्या भूमिकेवरुन नवा वाद हे भाजपचं मोठं षडयंत्र-अनिल देशमुख


नवचैतन्य टाईम्स नागपूर (प्रतिनिधी)-ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शिखर बँकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे नवा वाद उद्भवला आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी परस्परांना लक्ष्य केले आहे.
 लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काहीच फायदा न झाल्याने भाजपने षडयंत्र रचून अण्णा हजारे यांना जागे केले, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.
 पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले, ‘पाच वर्षांपासून अण्णा हजारे कुठेच दिसत नव्हते. त्यांचे आंदोलन, उपोषण बासनात गुंडाळल्यासारखे होते. महायुतीच्या अनेक मंत्र्यांवर आरोप झाले. मात्र, त्यावेळी हजारे जागे झाले नाहीत. लोकसभा निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण होताच, त्यांना अचानक जाग आली. महायुतीला अजित पवार यांच्या गटामुळे विशेष फरक पडला नाही. त्यांची उपयोगिता संपली असल्याने अण्णा हजारे यांच्या माध्यमातून त्यांना बदनाम करणे हा भाजपचा अजेंडा आहे. त्यासाठी हजारे यांचा ससेमिरा त्यांच्या मागे लावला असावा. फायदा आहे तोपर्यंत भाजप कुणालाही गोंजारते. काम संपले की राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न केला जातो. ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांची लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती. केंद्रीय पातळीवर त्यांची मोर्चेबांधणी झाली होती. त्यांना संधी दिली नाही. राज्यसभेची शक्यता वर्तवली जात असताना पक्षाने त्यांना डावलले. त्यामुळे ते नाराज आहेत. त्यांनी कुठल्या पक्षात राहावे, हा त्यांचा प्रश्न आहे.’लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणूकही महाविकास आघाडी एकत्र लढेल. यातही आम्ही यशस्वी होऊ, असा दावाही अनिल देशमुख यांनी केला.
 विरोधी पक्षाच्या इशाऱ्यावर!
एक तपापूर्वी अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर आंदोलन उपोषण केले. त्यांनी आतापर्यंत आराम केला, ते अचानक जागे झाले व विरोधी पक्षाच्या इशाऱ्यावरून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करणे सुरू केले’, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते व शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला. ‘अण्णा हजारे आता अजित पवार यांच्यावर बोलायला लागले. उपमुख्यमंत्र्यांचे नाव खराब करण्यासाठी काही नेत्यांचे प्रयत्न आहेत. आगामी काळात पवार मुख्यमंत्री होतील, त्यामुळे विरोधी पक्षाचा खटाटोप चालला आहे. यासाठी अण्णांना कुणी सुपारी दिली माहिती नाही’, असेही पवार म्हणाले. भ्रष्टाचार व घोटाळे करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कारागृहात आहेत. त्यांना पायउतार करण्यासाठी आणि त्यांना साथ देणाऱ्या काँग्रेस विरोधात हजारे यांनी परत आंदोलन करावे, असे आव्हानही प्रशांत पवार यांनी दिले.