NC Times

NC Times

नागपुरात अल्पवयीन कारचालकाने पाच जणांना चिरडले, भाजप कार्यकर्त्याचा मुलगा आरोपी निघाला


नवचैतन्य टाईम्स नागपूर (प्रतिनिधी)- उपराजधानीत ‘हिट ॲण्ड रन’ सुरूच असून अल्पवयीन कारचालकाने नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यंकटेशनगर चौकात हैदोस घातला. अनियंत्रित कारने दुचाकीला धडक देत तीन फळ भाजी विक्रेत्यांसह पाच जणांना चिरडले. झाडावर आदळून कार थांबली. शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली. महेंद्र अग्रवाल, वंदना अग्रवाल, भाजी विक्रेते बसंती गोंड, गोलू शाहू आणि कार्तिक अशी जखमींची नावे आहेत. या घटनेन परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्यंकटेशनगरमध्ये रस्त्यावर भाजी बाजार लागतो. येथे बसंती, गोलू आणि कार्तिक यांची दुकाने आहेत. शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अग्रवाल दाम्पत्य फळभाजी घेण्यासाठी थांबले. याचदरम्यान अल्पवयीन कारचालकाने (एमएच-२५-आर-३९२९ ) आधी दुचाकीला धडक देऊ तिघांना चिरडले. यात अग्रवाल दाम्पत्यासह पाच जण जखमी झाले. या घटनेने भाजी विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. यानंतर परिसरातील नागरिक संतापल्याचे चित्र पहायला मिळाले होते. त्यांनी अल्पवयीन चालकाला कारमधून बाहेर काढले. चोप द्यायला सुरुवात केली.
दरम्यान अन्य नागरिकांनी जखमींना विविध हॉस्पिटलमध्ये दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्यासह वाठोडा, नंदनवन आणि सक्करदरा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी अल्पवयीन चालकाला नागरिकांच्या तावडीतून सोडवून त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे अनर्थ टळला. या घटनेने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. कारचालक भाजप कार्यकर्त्याचा मुलगा आहे. टायर फुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे. नंदनवन पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
 राज्यात हिट ॲण्ड रनच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पुणे, नागपूर या शहरात नुकत्याच या घटना समोर आले आल्या आहे. आता या घटनेनं यात अजून भर पडली आहे. दरम्यान यातील आरोपी हे अल्पवयीन निघाले आहेत. या अपघातातही आरोपी अल्पवयीन निघाला आहे. तसेच तो भाजप कार्यकर्त्याचा मुलगा असल्याचे समोर आले आहे. आता या घटनेत पोलीस कसा तपास करतात तसेच यातील आरोपीला काय शिक्षा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.