NC Times

NC Times

अधिवेशनात आक्रमक भूमिका घ्या काँग्रेस नेत्यांना सूचना


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(एस.डी.कदम)- आजपासून सुरु होणारं विधानसभेचं पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची दाट शक्यता आहे. लोकसभेत सत्ताधारी महायुतीला भारी पडलेली महाविकास आघाडी विविध मुद्यावरुन सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. त्यातच काँग्रेसचे आमदार आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तशा स्पष्ट सूचना दिल्लीतील पक्ष नेतृत्त्वानं राज्यातील नेत्यांना दिल्या आहेत.
राज्यातील काँग्रेसच्या महत्त्वाची नेत्यांची काल दिल्लीत बैठक झाली. त्या बैठकीत काँग्रेस नेत्यांना विधानसभेच्या अधिवेशनात आक्रमक होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारच्या विविध विभागांमध्ये झालेले, होत असलेले भ्रष्टाचार बाहेर काढा, त्यावरुन महायुती सरकारला, मंत्र्यांना जाब विचारा. राज्य सरकार भ्रष्ट असल्याचा संदेश जनमानसात जाऊ द्या, अशा सूचना नेतृत्त्वाकडून राज्यातील काँग्रेस नेत्यांना देण्यात आल्या आहेत.
विधानसभेची निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर आलेली आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन ही विरोधकांसाठी शेवटची संधी असेल. त्यामुळेच पक्ष नेतृत्त्वानं राज्यातील काँग्रेस नेत्यांना आक्रमक पवित्रा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विविध मंत्रालयांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारावरुन रान उठवण्याचे आणि सरकारला घेरण्याचे आदेश काँग्रेस नेत्यांना मिळाले आहेत.
 विधानसभेतील विरोधी पक्षांची ताकद पाहिल्यास काँग्रेसचं बळ सर्वाधिक आहे. विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस आमदार आक्रमक भूमिका घेऊ शकतात. विधानसभा अधिवेशनात आणि त्यानंतरही महाविकास आघाडी म्हणून एकसंध रहावे लागेल.यात मी मोठा तु लहान अस करत बसन हे योग्य नाही. त्यावर भाष्य करणं टाळा, अशा सूचनाही काँग्रेस नेत्यांना देण्यात आल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेसनं १७ जागा लढवल्या. त्यातील १३ जागांवर पक्षाला यश मिळालं. सांगलीत काँग्रेसचा बंडखोर उमेदवार विजयी झाला. खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. गेल्या लोकसभेला केवळ एक जागा जिंकणारा काँग्रेस पक्ष यंदा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. विदर्भ, मराठवाड्यात काँग्रेसची कामगिरी चांगली झाली आहे सर्वत्र कॉग्रेस गोठात आनंदाचे वातावरण असल्याचे पहावयास मिळत आहे.