NC Times

NC Times

सांगलीवाडीत ८४ हजाराचा गांजा जप्त, कोथळी येतील संशयित तरूणास अटक


नवचैतन्य टाईम्स  सांगली (प्रतिनिधी)-
सांगलीवाडी येथील टोलनाक्याजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या अरिहंत राजगोंडा पाटील (वय ३२, रा. जैन मंदिरजवळ, कोथळी, ता. शिरोळ) याला सांगली शहर पोलिसांनी अटक केली. ८४ हजाराचा चार किलो ३९८ ग्रॅम गांजा, दुचाकी, दोन मोबाईल असा १ लाख ७३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.अधिक माहिती अशी, सांगली शहर पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक महादेव पोवार व पथक पेट्रोलिंग करत होते. तेव्हा मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास सांगलीवाडी टोलनाक्याजवळील शुभ मंगल कार्यालयाजवळ एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन पाहणी केली. तेव्हा कापडी पिशवी घेऊन थांबलेल्या अरिहंत पाटील याला ताब्यात घेतले. त्याची पिशवी तपासली असता ४ किलो ३९८ ग्रॅम वजनाचा ८४ हजार रूपयाचा गांजा मिळाला.त्याच्याकडून गांजा, दुचाकी, दोन मोबाईल असा १ लाख ७३ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस हवालदार मच्छिंद्र बर्डे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरिहंत पाटीलविरूद्ध अंमली औषधी द्रव व मनप्रभावी पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पोवार, अंमलदार संदीप पाटील, मच्छिंद्र बर्डे, सचिन शिंदे, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार, सुमित सूर्यवंशी, पृथ्वीराज कोळी, योगेश सटाले यांच्या पथकाने कारवाई केली.