NC Times

NC Times

अजित दादांच्या राष्ट्रवादीची झोळी रिकामी सात आकडा ठरला साडेसाती केंद्रासह राज्यातही अडचण


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(नेहाल हसन)-लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीचा फटका अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसताना दिसत आहे. चारपैकी केवळ एक जागा जिंकणाऱ्या, काका शरद पवारांकडून बारामतीच्या होमग्राऊंडवर पराभूत झालेल्या अजित पवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांचं राजकीय वजन घटत असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. लोकसभेचा केवळ एक खासदार असल्यानं अजितदादांच्या राष्ट्रवादीला नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील एनडीए मंत्रिमंडळात स्थान नसेल.
राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीची कामगिरी सुमार झाली. सत्ताधारी महायुतीला केवळ १७ जागा जिंकता आल्या. भाजपला सर्वाधिक ९, शिंदेसेनेला ७, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त १ जागा मिळाली. लोकसभेत भाजपच्या खासदारांची संख्या २४० वर आल्यानं एनडीए सरकारमध्ये मित्रपक्षांना स्थान देण्यात येईल, अशी चर्चा होती. टिडीपी, जेडीयूसह शिंदेसेनेला मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. पण अजित पवारांना लोकसभेतील कामगिरीमुळे सत्तेत सहभागी होता येणार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसला एनडीएच्या मंत्रिमंडळात एक मंत्रिपद मिळेल अशी शक्यता होती. त्यासाठी रायगडचे खासदार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल यांची नावं चर्चेत होती. पण हे दोन्ही खासदार वरिष्ठ असल्यानं त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देणं गरजेचं होतं. पण राष्ट्रवादीची लोकसभेतील सुमार कामगिरी याच्या आड आली. शिंदेसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्रिपद दिलं जाणार आहे. शिंदेंचे सात खासदार आहेत.
सात खासदार असलेल्या शिंदेसेनेला राज्यमंत्रिपद दिलं जाणार आहे. अशा परिस्थितीत एक खासदार असलेल्या राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रालय दिलं गेलं असतं तर शिंदेसेना नाराजी झाली असती. त्यामुळेच राष्ट्रवादीला केंद्रातील सत्तेत वाटा मिळणार नसल्याचं कळतं. सात हा आकडा राष्ट्रवादीसाठी आणखी अडचणीचा ठरला आहे. एनडीएतील सात पक्षांकडे प्रत्येकी एक खासदार आहे. त्या पक्षांना कॅबिनेट मंत्रालय देण्यात आलेलं नाही. राष्ट्रवादीला कॅबिनेट दिल्यास अन्य पक्ष नाराज होण्याची शक्यता असल्यानं दादांच्या राष्ट्रवादीची झोळी रिकामी राहिली आहे.