NC Times

NC Times

दरीबडची गावात पिसाळलेल्या लांडग्याची दहशत! हल्ल्यात ४ गावकरी गंभीर जखमी; १४ जनावरांनाही केलं लक्ष्य


नवचैतन्य टाईम्स  जत प्रतिनिधी(संजय शिंदे)-   तालुक्यातील दरिबडची येथे शेतातील काम करत असताना चौघांवर पिसाळलेला लांडग्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच १४ जनावरांवर ही हल्ला केल्याने जखमी झाले आहेत. जखमींवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शालन हणमंत कांबळे, पार्वती सुरेश घागरे, आनंद सत्यपाल गेजगे, विकास संभाजी भोसले अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून सांगली, मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जत तालुक्यातील लमाणतांडा दरीबडची कडे शालन हणमंत कांबळे यांची डाळिंब शेत आहे. या डाळिंब बागेत काम करत असताना अचानकपणे पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला केला. या हल्ल्यामुळे तोंडाला, हातापायाला चावा घेतल्याने गंभीर जखमी झाले आहेत. तसेच जवळच असलेल्या पार्वती सुरेश घागरे यांनी शेतात भांगलण करत असताना त्यांच्यावरही हल्ला करून हाताला चावा घेतला आहे. त्याही जखमी झाल्या आहेत.
 पिसाळलेल्या लांडग्याने एवढ्यावर न थांबता शेतातील चरत असलेल्या गाय, म्हैस, रेडी अशा सात ते आठ जनावरांना चावा घेत आपला मोर्चा गावाखालील शेतीकडे वळवला. त्यात आनंद सत्यपा गेजगे शेतातील काम करत असताना त्यांच्यावर लांडग्याने हल्ला केला. पिसाळलेला लांडग्याने त्यांच्या पूर्ण अंगावर हल्ला चढवत अक्षरशः गंभीर जखमी केले आहे. त्यानंतर लांडग्याने भोसले वस्तीतील मेजर विकास तानाजी भोसले यांच्यावर हल्ला चढवून त्यांना जखमी केले आहे. या दरम्यान, गावालगतच्या बिग बाजार दुकानाच्या पाठीमागे शेतामध्ये चरत असलेल्या शिवाजी भोसले यांच्या रेडीला, वसंत माने यांची गाय आणि रेडी, गोपाळ माळी यांची म्हैस गाय या जनावरांवर पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला चढवत जखमी केले आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी पिसाळलेल्या लांडग्याचा पाठलाग केला होता. मात्र रायाप्पा कन्नुरे वस्तीनजीक या लांडग्याचा मृत्यू झाला असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.