NC Times

NC Times

पंकजांना शेवटपर्यंत तंगवलं, दानवेंना घरी बसवलं, अशोकरावांवर खाली बघायची वेळ, मराठवाड्यात 'जरांगे बॉस'


नवचैतन्य टाईम्स  छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)-मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा सत्ताधारी पक्षांच्या विरोधात जबरदस्त रोष दिसला. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाने परभणी, बीड, जालना, नांदेड मतदारसंघात प्रभाव दिसला. बीड व परभणी लोकसभा मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा ध्रुवीकरण झाले होते. मराठवाड्यात जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशीव मतदारसंघात ‘जरांगे फॅक्टर’ प्रभावी ठरला आहे. त्यामुळेच २५ वर्षांची दानवेंची जिल्ह्यातील सत्ता जनतेने उलथवून लावली. दुसरीकडे नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण आणि हिंगोलीत नागेश पाटील आष्टीकर यांनी विरोधी उमेदवारांना आस्मान दाखवले. त्यांच्या विजयात मराठा आंदोलनाचा अर्थात मनोज जरांगे यांचा मोठा वाटा राहिला.
 मराठवाड्यात ‘जरांगे फॅक्टर’ लोकसभा निवडणुकीत प्रभावी दिसला. बीड आणि परभणी लोकसभा मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा ध्रुवीकरण झाले होते. त्यामुळे निवडणूक अतिशय चुरशीची झाली. बीडमध्ये तर संध्याकाळी साडे वाजले तरी निवडणूक निकाल जाहीर होऊ शकलेला नव्हता.अगदी शेवटच्या फेरीपर्यंत बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यात चुरशीची लढाई झाली. इकडे परभणीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव विरुद्ध महायुतीचे महादेव जानकर यांच्यात लढत झाली. या लढती जातीय ध्रुवीकरणामुळे राज्यभर चर्चेचा विषय ठरल्या होत्या.
 बीडमध्ये जरांगे पाटलांचा सर्वाधिक परिणाम
मनोज जरांगे यांनी बीड आणि परभणी जिल्ह्यातील गावात नारायणगड येथील नियोजित सभेच्या पार्श्वभूमीवर सभा घेतल्या होत्या. या सभांचा निवडणुकीवर परिणाम झाल्याची चर्चा होती. उपोषण करुन आरक्षण मिळत नाही, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले होते. त्यानंतर जरांगे यांनी मुंडे यांच्यावर टीका केली होती. निवडणूक दोन दिवसांवर आली असताना त्यांनी लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित करीत आव्हान दिले होते.
 परभणीत संजय जाधव विजयी, जालन्यात जनतेने दानवेंना घरी बसवले
परभणी मतदारसंघात महाविकास आघाडीचे संजय जाधव विजयी झाले.जालना मतदारसंघात भाजपचे रावसाहेब दानवे यांना अनेक गावात मराठा आंदोलकांनी विरोध झाला होता. सत्ताधाऱ्यांच्या रोषातील एक लाखापेक्षा अधिक मतदान अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांच्याकडे वळूनही काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे मोठ्या मतांनी विजयी झाले.
 नांदेड जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाण यांना गावबंदी केली होती
नांदेड जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाण यांना गावबंदी केली होती. या मतदारसंघात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी झाले. हिंगोली मतदारसंघात महाविकास आघाडीचे नागेश आष्टीकर विजयी झाले. कमी-अधिक प्रमाणात सर्व मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.