NC Times

NC Times

ओबीसी आंदोलनाकडे तुमचे पाय का वळत नाहीत-मा. विजय वडेट्टीवार


नवचैतन्य टाईम्स (वडीगोद्री)जालना (प्रतिनिधी)  मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, या प्रमुख मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या प्रा. लक्ष्मण हाके यांची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भेट वडीग्रोदी येथील आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली. प्रा. हाके यांची खालावलेली प्रकृती पाहून विजय वडेट्टीवार यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोनवरून संपर्क करून आंदोलनाची दखल घेण्याची विनंती केली. ओबीसी प्रवर्गात जवळपास ३५० जाती आहेत, त्यामुळे आम्ही लवकर संघटित होत नाही. परंतु दिवसेंदिवस ओबीसी जनतेचा उद्रेक होतो आहे, त्यामुळे सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. त्याचवेळी सरकारचे शिष्टमंडळ उद्या म्हणजेच शुक्रवारी वडीगोद्रीला आंदोलनस्थळी येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे वडेट्टीवार यांनी आंदोलकांना सांगितले.
कुणबी आणि मराठा एकच असल्याचे सांगत मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे अंतरवालीत उपोषणाला बसलेले असताना दुसरीकडे जालन्याच्या अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे 'ओबीसी आरक्षण बचाव' म्हणत लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी वाघमारे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा गुरूवारी आठवा दिवस होता. जरांगे यांच्या आंदोलनाला सरकार गांभीर्याने घेत असताना हाके यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष झाल्याचे आरोप होत आहेत. अशात लक्ष्मण हाके यांची प्रकती ढासळत असल्याने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनस्थळी जाऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली.
 विजय वडेट्टीवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन
ओबीसीच्या संविधानिक हक्कांसाठी प्राणांतिक उपोषण सुरू करून प्रा. हाके यांना आठ दिवस झालेत. माझे आंदोलनाकडे लक्ष होते. माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणे सुरू होते. म्हणून मला यायला उशीर झाला. त्यांचे समर्पित भावनेने उपोषण सुरू आहे. ओबीसी समाजात जन्मलेला कार्यकर्ता म्हणून मी ओबीसीच्या मागे उभे राहणे ही माझी जबाबदारी समजतो. माझ्या कर्तव्यापासून मी मागे हटणार नाही. सत्ता आणि पद जात येत असते. त्याचा विचार कधीही केला नाही, समाजाच्या हक्कासाठी त्यांच्यामागे उभा राहिलेलो आहे, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी स्पष्ट केली.
आत्ताच बिहारच्या उच्च न्यायालयाचा निकाल आला. कोर्टाने सांगितले- ६५ टक्क्यांच्यावरचे आरक्षण मान्य करता येणार नाही. कायदा कळणाऱ्यांना तो नेमका निर्णय कळेल, असे वडेट्टीवार म्हणाले. २०१४ पासून राज्यातली परिस्थिती चिघळली. समाजाची मते मिळविण्यासाठी खोटी आश्वासने देण्यात आली. समाज एकमेकांविरोधात उभा ठाकेल, अशी रणनीती आखली गेली. आज जे सर्व चाललेय हे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उभा राहिलेला वाद आहे, असे म्हणत त्यांनी भाजपला सुनावले.
 आमच्यामध्ये असुरक्षितता कशाला निर्माण करताय?
आमच्या हक्काचे आरक्षण काढून घेऊन आमच्यामध्ये असुरक्षितता कशाला निर्माण करताय? असा सवाल विचारत जो समाज एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी होत होता, तो समाज एकमेकांचा वैरी होत चाललाय, लग्नात भेटला तर एकमेकांकडे आता बघतही नाही. हे कशाचे द्योतक आहे? आज समाजातील समता बिघडविण्याचे काम सुरू, खोटी आश्वासने दिली नसती तर असे प्रकार झाले नसते, अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारला सुनावले.
 ओबीसी आंदोलनाकडे तुमचे पाय का वळत नाहीत?
ओबीसीत प्रचंड जाती असल्यामुळे आमचा समूह सहजासहजी एकत्र येत नाही. याचा अर्थ असा नव्हे की आमचा गळा घोटला तरी आम्ही शांत बसावे. आमच्या छातीवर नाचून दुसऱ्यांनी धिंगाणा करावा. आंदोलने ही न्याय हक्कांसाठी असतात. एका आंदोलनाला एक आणि दुसऱ्या आंदोलनाला वेगळी भूमिका कशी असू शकते? आठवडा उलटून गेला तरी सरकारचे पाय ओबीसी आंदोलनाकडे वळत नसतील तर तुमच्या भूमिकाविषयी आमच्या मनात नक्कीच संशय आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
 विधिमंडळात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लावून धरेन
महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. विधिमंडळात आम्ही ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लावून धरू. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असा आग्रह मी सरकारकडे धरेन, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
 ओबीसी म्हणून आम्हालाही बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो
मी माझ्या ठिकाणी झुंजतोय, कारण ओबीसीमध्ये मोडतो म्हणून... आम्हाला काय संघर्ष करावा लागतो, याची जाहीर वाच्यता करता येत नाही. ज्या दिवशी आमच्या नाकातोंडात पाणी येईल, त्यादिवशी लोकांसमोर ते ही मांडू. आम्हालाही राजकारणात बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो, असे सांगत ओबीसी आरक्षणावर ठोस भूमिका घेताना कुचंबना होत असल्याचेच अप्रत्यक्षपणे वडेट्टीवार यांनी सांगितले.