NC Times

NC Times

धनंजय मुंडेनी बीड मध्ये आयुष्य संपवलेल्या तरुणाच्या मुलांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी


नवचैतन्य टाईम्स माजलगाव प्रतिनिधी(सुग्रीव कदम)-  लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाला. या पराभवाच्या दुःखात आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी गावच्या पोपटराव वायभासे या तरुणाने आत्महत्या केली होती. या निमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी वायभासे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच पोपटराव वायभासे यांच्या कुटुंबाची आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
 निवडणुकांमध्ये जय - पराजय होत असतात मात्र या विवंचनेतून कोणी आपला जीव गमवावा, ही आमच्या मनात अपराधीपणाची भावना उत्पन्न करणारी बाब आहे. कुटुंबासाठी देखील हे कधीही न भरून निघणारे मोठे दुःख आहे, त्यामुळे संयमाने जय-पराजय घ्यावेत. कोणतीही निवडणूक अंतिम नसते. कुणीही टोकाचा निर्णय घेऊ नये,' अशा शब्दात यावेळी धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, मयत पोपटराव यांस एक मुलगा, मुलगी व पत्नी असा परिवार आहे. या संपूर्ण परिवाराची तसेच दोन्ही लेकरांच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेत असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. दोन्ही मुलांच्या नावे प्रत्येकी अडीच लाख रुपयांची मुदत ठेव देखील धनंजय मुंडे यांच्या वतीने पोपटराव यांच्या मुलांना देण्यात येत आहे. यावेळी शिवा शेकडे, सुधीर भाऊ पोटे, प्रदीप वायभासे, सचिन वायेभासे, सचिन घुले, प्रा कैलास वायभासे, विलास वायभासे, युवराज वायभासे देवळली चे सरपंच पोपट शेकडे, गंगादेवी चे सरपंच विठ्ठल नगरगोजे, दत्तू शेकडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील दिघोळ आंबा गावातही अशीच एक घटना घडली होती. पंकजा मुंडे यांचे समर्थक पांडुरंग सोनवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पंकजा मुंडे यांचा लोकसभेतील पराभव जिव्हारी लागला म्हणून पांडुरंगने आपले जीवन संपवलं असल्याचं जवळच्या नातेवाईकांकडून आणि सरपंचांकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे लवकरच पंकजा मुंडे आभार दौरा काढणार आहेत. यावेळी त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेणार आहेत.