NC Times

NC Times

वट पौर्णिमेची करा अशी तयारी! पाहा पूजेसाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी


 बऱ्याच नवविवाहित स्त्रिया यंदा आपली पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहेत. त्यामुळे हा दिवस त्यांच्यासाठी अतिशय खास आहे. जाणून घ्या वटपौर्णिमेची पूजा पद्धत…
हिंदू धर्मात विविध सण-उत्सव साजरे केले जातात. प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता सण आवर्जून साजरा केला जातो. यातील प्रत्येक सण कोणत्या ना कोणत्या देवी-देवतांना समर्पित असतो. म्हणूनच प्रत्येक सणाचे एक खास वैशिष्ट्य असते. त्यातीलच एक सण म्हणजे वटपौर्णिमा होय. वटपौर्णिमा हा सण प्रत्येक स्त्रियांसाठी अतिशय खास असतो. यादिवशी प्रत्येक सुवासिनी स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी पूजापाठ आणि व्रत करते. बऱ्याच नवविवाहित महिला यंदा आपली पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहेत. त्यामुळे हा दिवस त्यांच्यासाठी अतिशय खास आहे. तुमचा हा दिवस आणखी खास बनविण्यासाठी पुढे सांगितलेल्या विधी आणि साहित्याचा वापर करुन पूजापाठ केल्यास विशेष लाभ प्राप्त होतो.
 हिंदू शास्त्रानुसार ज्येष्ठ महिन्यात जी पौर्णिमा असते त्यालाच वट पौर्णिमा असे संबोधले जाते. विवाहित स्त्रियांच्या आयुष्यात या सणाचे प्रचंड महत्व आहे. यादिवशी स्त्रिया अतिशय सुंदर असा साजशृंगार करुन एका नववधूप्रमाणे आपल्या पतीच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्याची प्रार्थना करतात. विशेष म्हणजे स्त्रिया यादिवशी मनोभावाने वडाच्या झाडाची पूजा करतात. वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतात. हिंदू मान्यतेनुसार याच झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवदान दिले होते. अध्यात्मात सत्यसावित्री ही कथा फारच प्रसिद्ध आहे. शास्त्रानुसार तीन दिवस वटपौर्णिमेचा व्रत अर्थातच उपवास केला जातो. मात्र बऱ्याच स्त्रियांना तीन दिवस व्रत करणे शक्य नसते. अशावेळी या महिला वटपौर्णिमेदिवशी व्रत ठेऊन आपल्या अखंडित सौभाग्याची प्रार्थना करतात.
वटपौर्णिमेची तारीख
यंदा २१ जून २०२४ रोजी महाराष्ट्रात वटपौर्णिमा साजरी केली जात आहे. यादिवशी स्त्रिया मराठामोळ्या सौभाग्यच्या साजात नटूनथटून पूजेसाठी एकत्र जमतात. वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून त्याची मनोभावाने पूजा करतात. हिंदू शास्त्रानुसार वडाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवतांचा वास असतो. त्यामुळेच या झाडाचे पूजन केल्यास या देवतांचा आशीर्वाद पती-पत्नी दोघांनाही लाभतो. देवतांच्याआशीर्वादाने त्यांच्या वैवाहिक आयुष्यत सुखसमृद्धी आणि आनंद प्राप्त होते.
 वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य
विविध शुभ साहित्यांच्या आधारे वटपौर्णिमेची पूजा केली जाते. वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तांब्याचा कलश, पंचामृत, पंचपात्र, चौरस, पाट, फुले आणि दुर्वा, हिरव्या किंवा लाल रंगाचे एक वस्त्र, तुळशीपत्र, ५ नाणी, वटसावित्री पूजेचे पुस्तक, अष्टगंध, हळदी-कुंकू, ५ फळे, खडीसाखर, गूळ, दोन खोबऱ्याचे बक्कल, १० सुपाऱ्या, २५ विड्याची पाने, तूप, २ बदाम, २ खारका, ताम्हण, दूध-साखरेचे नैवेद्य, सूतबंडल इत्यादी गोष्टी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आवश्यक असतात.
वटपौर्णिमेच्या पूजेची योग्य पद्धत
वैदिक शास्त्रानुसार कोणतीही पूजा योग्य विधी आणि नियमानुसार केल्याने त्याचा विशेष लाभ आपल्याला मिळतो. त्यामुळेच स्त्रियांनी वटपौर्णिमेची पूजादेखील अतिशय योग्यरीत्या करायला हवी. सर्वप्रथम वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करुन साजशृंगार करावा. त्यांनंतर पूजेच्या साहित्यात असणाऱ्या सुपारीच्या साहाय्याने श्री गणेशाची स्थपणा करावी. नंतर त्यावर अक्षता आणि हळदीकुंकू अपूर्ण करुन घ्यावे. त्यांनंतर सुपारीची स्थापना करत त्याची पूजा करावी. आणि ओटीसुद्धा भरुन घ्यावी.
 पुढे वटवृक्षाला सात वेळा जल अर्पण करत प्रदक्षिणा घालावी. आपण घेतलेले सुतबंडल वटवृक्षाला गुंडाळत सात वेळा प्रदक्षिणा घालावी. त्यांनंतर नियमाप्रमाणे तेल किंवा तुपाचा दिवा लावावा. ओटी भरुन पंचामृत, नाणी, फुले, ५ फळे अर्पण करावी. तसेच वटवृक्षाला हळदी-कुंकू लावून नैवेद्य आणि आंबे अर्पण करावे. पाच विवाहितांना हळदी-कुंकू लावत त्यांची ओटी भरावी. ओटीमध्ये गहू आणि फळे घालावे. शिवाय सायंकाळच्या वेळी सुवासिनींना घेऊन सावित्रीच्या कथेचे वाचन करावे.