NC Times

NC Times

नाही तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल-उपमुख्यमंत्री अजित पवार

नवचैतन्य टाईम्स  मुंबई
नवचैतन्य टाईम्स प्रतिनिधी मुंबई (एस.डी.कदम)-राज्यातील महायुतीत काहीही आलबेल नसल्याचं सातत्यानं दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुतीच्या पराभवास अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जबाबदार धरलं जात आहे. भाजप नेत्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना अजित पवारांमुळे आमची मतं वाढल्याचं म्हटलं. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मासिकातून थेट अजित पवारांना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यानंतर, महायुतीमधील काही नेतेही खासगीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोष देत आहेत. त्यावर, आता पहिल्यांदाच अजित पवारांच्या नेत्याने तोफ डागली असून थेट वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराच महायुतीच्या नेत्यांना दिला आहे.
 महायुतीतील भाजप आणि शिवसेनेच्या पराभवाला अजित पवार यांना कारणीभूत धरलं जात असून भाजपचे काही नेते खासगीत तसं बोलत असल्याचे समजते. विशेष म्हणजे अजित पवारांचे आमदार असलेल्या बहुतांश मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना मतदानात पिछाडीवर जावे लागले आहे. तर, मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे यांनीही अजित पवारांच्या पक्षाने आपणास मदत न केल्याचं जाहीरपणे बोलून दाखवलं होतं. त्यामुळे, महायुतीत एकसुत्रता आणि एकोपा नसल्याचे समोर आले. त्यानंतर, निवडणूक निकालात अजित पवारांच्या आमदारांचा म्हणावा तेवढा फायदा भाजपला झाला नाही. याशिवाय अल्पसंख्याक समाजही अजित पवारांसमवेत न राहिल्याचे दिसून आले. त्यामुळे, अजित पवार महायुतीच्या पराभवाचे व्हिलन ठरवले जात आहेत. त्यावरुन, आता अमोल मिटकरी यांनी थेट इशाराच दिला आहे. ''भारतीय जनता पार्टीच्या एका बैठकीत अजित पवार यांच्यामुळे आपला पराभव झाला अशा पद्धतीची भावना काही आमदारांनी व्यक्त केली. माझं त्यांना सांगणं आहे की, जर जाणीवपूर्वक अजित पवारांना टार्गेट केलं जात असेल तर आम्हाला देखील वेगळा विचार करावा लागेल,'' अशा शब्दात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे, महायुतीत खटके उडत असल्याचं आता समोर आलं आहे.                                                                                आव्हाडांकडून अजित पवारांची पाठराखण
अजित पवार यांना भाजप बळीचा बकरा करू पाहत आहे. उत्तर प्रदेशात मोदींना कमी मतं मिळाली, याला अजित पवार जबाबदार आहेत का? याचं उत्तर भाजपने द्यावं. भाजपची मत संख्या कमी झाली, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला. उत्तर प्रदेशमध्ये नरेंद्र मोदी यांना कमी मते मिळाली. तिथं काय अजित पवार होते का? छोट्या छोट्या कारणाने टिव्हीवर बोलणारी माणसं आता कुठे गेली? ऑर्गनायजरबाबत ते बोलत नाहीत. इकडून तिकडे उडाया मारणारे बोलूच शकत नाहीत. ज्यांना अजित पवार यांनी मोठं केलं, त्यांनी तरी किमान बोलायला हवं, असेही आव्हाड म्हणाले.