NC Times

NC Times

विधानसभेसाठी मोदी शहांचा मास्टर प्लॅन महाराष्ट्रात प्रभारीपदी भूपेंद्र यादव तर सहप्रभारीपदी अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती


नवचैतन्य टाईम्स  मुंबई प्रतिनिधी(एस.डी.कदम)-  लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रासह अनेक राज्यात म्हणावे तसे यश मिळाले नाही. परिणामी पक्षाने याची गंभीर दखल घेतली असून आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने कंबर कसली आहे. परिणामी देशभरात अनेक ठिकाणी होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता पक्षाने निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींची घोषणा सोमवारी केली. यात महाराष्ट्रासाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे निवडणूक प्रभारींची जबाबदारी देण्यात आली असून सहप्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर विश्वास टाकला आहे
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी यासंदर्भातील घोषणा सोमवारी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली. यावेळी महाराष्ट्रासह, हरियाणा, झारखंड आणि जम्मू कश्मीर या प्रदेशासाठी विधानसभा निवडणुकांकरिता प्रभारी आणि सहप्रभारी जाहीर करण्यात आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता या घोषणा महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. या प्रभारी आणि सहप्रभारींची घोषणा करताना पक्षाने केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांवर जबाबदारी टाकली असल्याने राजकीय वर्तुळात सोमवारी दिवसभर याची चर्चा रंगली.
भूपेंद्र यादव महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रभारी, अश्विनी वैष्णव सहप्रभारी
या घोषणेनुसार महाराष्ट्राकरिता केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. अश्विनी वैष्णव यांच्याकडे सहप्रभारी म्हणून कारभार असणार आहे. हरियाणा विधानसभेसाठी केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान यांच्याकडे निवडणूक प्रभारीपद देण्यात आले आहे. सहप्रभारी पदाची जबाबदारी बिप्लब कुमार देब यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
 झारखंड, जम्मूमध्ये कुणाच्या खांद्यावर जबाबदारी?
झारखंडसाठी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे निवडणूक प्रभारीपद देण्यात आले आहे. सहप्रभारी म्हणून हिंमता विश्वा सरमा यांच्याकडे सहप्रभारी पदी नेमणूक सोमवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांच्याकडे जम्मू काश्मीर येथील विधानसभेसाठी निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.