NC Times

NC Times

भावाने धाकट्या बहिणीला संपवलं, स्वत: जीव घेतल्याचा केला होता बनाव


नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)- बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करून पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्या भावानेच बहिणीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. बहीण आणि भावाचे घरात भांडण झाले होते. त्या रागातून भावाने बहिणीचा गळा दाबला. यात तिचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हडपसर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदनाच्या अहवालात खुनाचा प्रकार समोर आल्याने भावावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
 ईदच्या दिवशी बहिणीला संपवलं
साफिया सुलेमान अन्सारी (वय १६, रा. रिद्धी सिद्धी अपार्टमेंट, वैदुवाडी, हडपसर) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. शरीक सुलेमान अन्सारी (वय १८) असे भावाचे नाव आहे. हडपसर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मंगल मोंढवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी ईदनिमित्त साफिया आणि शरीक यांचे आई-वडील बाहेर गेले होते.
बहीण-भावात कपडे घेण्यावरुन वाद
बहीण-भाऊ घरात असताना कपडे घेण्यावरून त्यांच्यात भांडणे झाली. रागात बहिणीने दरवाजा बंद करून घेतला. बाहेर असलेल्या शरीकने दरवाजा जोरजोरात वाजवायला सुरुवात केली. त्या वेळी बहिणीने दरवाजा उघडला, तेव्हा दोघांत पुन्हा भांडण झाले. शरीकने रागाच्या भरात बहिणीचा गळा दाबला; यात तिचा मृत्यू झाला. घरात कोणी नसल्याने त्याने ओढणीच्या साह्याने तिला फॅनला लटकावले आणि बहिणीने आत्महत्या केल्याचे षड्‌‌यंत्र रचले. घटनास्थळी पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
शवविच्छेदनानंतर सत्य समोर
शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर आत्महत्येचा प्रकार नसून, तो खून असल्याचे समोर आले. त्यामुळे भावाविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.