NC Times

NC Times

बकरी ईदनिमित्त मालेगाव बाजार फुलला बोकडांची लाखांत बोली


नवचैतन्य टाईम्स मालेगाव (प्रतिनिधी)-  मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण सोमवारी (दि.१७) साजरा होणार असून, त्या पार्श्वभूमीवर मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (दि.१४) जनावरांच्या खरेदी-विक्री बाजारात मोठी उलाढाल झाली. ईदच्या दिवशी कुर्बानीला महत्त्व असल्याने मुस्लिम बांधवांनी बोकड, शेळी, मेंढ्यांची खरेदी केली. तब्बल दीड लाख रुपयापर्यंतची किमत एका बोकडला मिळाली.
 बकरी ईदच्या कुर्बानीसाठी महापालिकेने शहरात तात्पुरते १४ कत्तलखाने उभारले आहेत. येथील बाजार समितीत दर शुक्रवारी जनावरांचा बाजार भरतो. बकरी ईदच्या आधी येणाऱ्या जनावरांच्या बाजाराला विशेष महत्त्व असते. शुक्रवारी बाजार समिती आवार तसेच कॉलेज ग्राउंड व कॅम्प रस्त्यावर जनावरे खरेदी-विक्रीसाठी मोठी गर्दी झाली होती. सुमारे पाच हजार बोकड, शेळी, मेंढी विक्रीसाठी दाखल झाले होते. दोन ते तीन हजारांपासून ते लाखो रुपयांत जनावरांची खरेदी-विक्री झाली. एका बोकडला तब्बल दीड लाखाचा भाव मिळाला. दरवर्षी मालेगावच्या जनावरांच्या बाजारात बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर परराज्यातून देखील विक्रीसाठी जनावरांची आवक होते.
यंदा जनावरांची आवक कमी
गतवर्षीच्या तुलनेत यंदा परराज्यातील जनावरांची आवक कमी झाल्यामुळे जनावरांचे भाव वाढल्याचे जाणकारांनी सांगितले. बाजार समितीला देखील यामुळे आर्थिक फायदा होत असून, या बाजारातून बाजार समितीच्या उत्पन्नात अडीच ते तीन लाखाची भर पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान या खरेदी विक्रीमुळे सकाळी कॅम्प रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.