NC Times

NC Times

कोकणात बिबट्याची नखे विक्रीसाठी वनविभागाची मोठी कारवाई चार जण ताब्यात


नवचैतन्य टाईम्स रत्नागिरी प्रतिनिधी(सुहास कुडाळ)-मुंबई - गोवा महामार्गावरील खेड भरणे जाधववाडी नजीक बिबट्या वाघाची नखे विक्रीसाठी घेऊन आलेल्या ३ संशयितांना चिपळूण वनविभागाकडून मुद्देमालासह ५ जून रोजी ताब्यात घेतले. तर गुरुवारी केलेल्या कारवाईत एकाला बिबट्या वाघाच्या नखासह ताब्यात घेण्यात आले आहे. संरक्षित असलेल्या बिबट्या वाघाची नखे थेट विक्रीसाठी आणल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वन्य प्राण्यांची हत्या करणाऱ्या या संशयित गुन्हेगारांना चौकशी करून कठोर शासन करावे अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.
 पाच जून रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, भरणे ता. खेड गावच्या हद्दीत मुंबई - गोवा महामार्गावर स्थानिक ठिकाण जाधववाडी इते बिबट्या या वन्यप्राण्याची नखे विक्रीसाठी अज्ञात व्यक्ती रिक्षामधून घेऊन येणार असलेची माहिती मिळाली होती.
इथे सापळा रचून तीन संशयित दिलीप सावळेराम कडलग वय - ४८ रा. घाटकोपर, मुंबई, अतुल विनोद दांडेकर, वय ३६ रा. चेंबुर, मुंबई, विनोद पांडुरंग कदम वय ४२ रा. सावर्डे ता. चिपळूण यांच्या ताब्यातील रिक्षा क्र. एम एच ०३ बी ए ९७१२ मधून संशयितरित्या फिरत असल्याचं निदर्शनास आले. त्यानंतर त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडून बिबट्याची एकूण ४ नखे आणि रिक्षा हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी ३ जणांवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ सुधारणा २०२२ कलम ९, ३९, ४८अ, ४९, ५१, ५२ आणि ५७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 साखरपामध्ये कारवाई, एक जण ताब्यात
दरम्यान गुरुवारी संशयित अतुल विनोद दांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, साखरपा ता. संगमेश्वर येथे सापळा रचून सचिन रमेश गुरव रा. गोविळ ता. लांजा जि. रत्नागिरी या व्यक्तीला बिबट्या या वन्यप्राण्याच्या एकूण ४ नखे आणि हिरो कंपनीची दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रकाश पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली हे करत आहेत.