NC Times

NC Times

सांगलीत अखेर विशाल पाटलांनी गुलाल उधळला


नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी(संजय शिंदे)-सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमधून बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला. विजयी आघाडी मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना विशाल पाटलांनी भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्या-पदाधिकाऱ्यांनी आपल्याला मदत केल्याचं म्हटलं. ज्यांनी धाडसाने माझ्यासाठी काम केलं, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी विशाल पाटील यांनी घेतली.
 विशाल पाटील काय म्हणाले?
जगताप साहेबांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन माझ्यासाठी काम केलं. जयश्री वहिनींनी काँग्रेसच्या असून जाहीर व्यासपीठावर येऊन, प्रत्येक घरात, गल्लीबोळात जाऊन माझा प्रचार केला. आमच्या घरातले प्रतीकदादा, आमच्या आई यांनी जोरदार काम केलं. स्वर्गीय पतंगराव कदम यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्या सर्व गटाने माझी पाठराखण केली, मला मोठं मताधिक्य दिलं. आर आर आबा यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांचा मतदारसंघ हा मावळत्या खासदारांचा मतदारसंघ होता, पण तिथेही मला मताधिक्य मिळालं, कारण आबांचे माझ्यावर असलेले आशीर्वाद, असं विशाल पाटील म्हणाले.
 शिवसेना नेते अनिल बाबर यांचं दोन-चार महिन्यापूर्वीच निधन झालं. पण ते जिथून आमदार होते, त्यांना मानणारा वर्ग आहे. तिथे १७-१८ हजारांचं मताधिक्य मला मिळालं. विटा शहरात मला वाटलं नाही की मताधिक्य मिळेल. पण भाजपचे औटी, देवमाने असतील, दुर्वे असतील राष्ट्रवादीचे बागवान, काँग्रेसचे नगरसेवक यांनी धाडसाने माझं काम केलं, म्हणून मला २५ हजारांचं मताधिक्य मिळालं. सांगलीत सगळे काँग्रेस पदाधिकारी माझ्या पाठीशी होते, असा गौप्यस्फोट विशाल पाटलांनी केलं.
हा विजय जनतेचा आहे                                      ज्यांनी धाडसाने माझ्यासाठी काम केलं. ज्यांना त्रास झाला, धमक्या दिल्या, त्यांना मी आश्वासित करतो, की तुमच्या संरक्षणासाठी मी सक्षम आहे. काही अडचणींमुळे जे मला मतदान करु शकले नाहीत, त्यांच्याविषयी माझ्या मनात कुठलाही आकस नाही. मी सगळ्यांना सोबत घेणार, कुणाला त्रास देणार नाही, असंही विशाल पाटील म्हणाले.