NC Times

NC Times

पुणे जिल्हाधिकाऱ्यांची मतमोजणीपूर्वी बदली करण्याची दादा गटाची मागणी


नवचैतन्य टाईम्स  पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)-पुणे जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सुहास दिवसे हे राजकीय प्रभावातून काम करत असल्याचा आरोप करत लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणी आधीच त्यांची बदली करण्याची मागणी खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे. सुहास दिवसे हे खेड आळंदीच्या आमदारांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप कट्यारेंनी पत्रातून केला आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलीप मोहिते पाटील आमदार आहेत. त्यामुळे कट्यारेंचा नेमका रोष कोणाकडे आहे, हे स्पष्ट होतं.
काय आहे प्रकरण?
"सुहास दिवसे अनेक वर्षे कृषी आयुक्त, क्रीडा आयुक्त, पीएमआरडीएचे संचालक अशा विविध पदांवर काम करत पुण्यातच ठाण मांडून आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या राजकीय हितसंबंधांचा वापर केला आहे. दिवसे खेड आळंदीच्या आमदारांच्या प्रभावातून काम करतात.‌ निवडणुकीच्या काळात दिवसे सतत त्यांना भेटत होते. त्या आमदाराचाही सुहास दिवसेंना प्रशासकीय सेवेच्या सुरुवातीपासून पाठिंबा राहिला आहे" असा आरोप कट्यारे यांनी केल्याची माहिती आहे.
सुहास दिवसे हे राजकीय प्रभावातून काम करत असल्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीआधी त्यांची बदली करावी, अशी मागणी कट्यारे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे. कट्यारेंनी पत्रात दिलीप मोहिते पाटलांचे थेट नाव घेत उल्लेख केलेला नसला, तरी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार या उल्लेखातून त्यांचा अंगुलीनिर्देश मोहिते पाटलांकडेच असल्याचे स्पष्ट होते. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
पुणे पोर्श कार प्रकरणात अजित पवार गटातील आमदार सुनील टिंगरे रडारवर होते. तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांनीही आता अटक झालेल्या डॉक्टरची त्यावेळी शिफारस केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे दादा गटातील आमदार-मंत्री या न त्या कारणाने चर्चेत असल्यामुळे अजित पवार यांची डोकेदुखीही वाढण्याची शक्यता आहे.