NC Times

NC Times

जिंकणार तर 'पाटील'च! पण कोणते? सांगलीकरांचा कौल कुणाला?


नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी(संजय शिंदे)- 
सांगली लोकसभा मतदारसंघात तीन पाटील आमने-सामने आहेत. महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील (ठाकरे गट), महायुतीचे संजयकाका पाटील, तर काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवलेले विशाल पाटील अशी तिरंगी लढत सांगलीत पाहायला मिळत आहे. काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात ठाकरे गटाने दबावाचं राजकारण करुन येथे आपला उमेदवार पक्का केला. 
काँग्रेसचा गड, भाजपचा कब्जा
सांगली लोकसभा मतदारसंघ गेली अनेक दशके काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र 2014 साली या बालेकिल्ल्याला भाजपने सुरुंग लावला.  मुळचे राष्ट्रवादीचे असलेले संजयकाका 2014 ला ऐनवेळी भाजपात आले आणि खासदार झाले. त्यांना 2019 साली पुन्हा एकदा मैदानात उतरवण्यात आले. मोदी लाटेत संजयकाका पुन्हा विजयी झाले. त्यानंतर आता भाजपने पुन्हा एकदा संजयकाका पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आहे. यंदा त्यांना विजयाची हटट्रिक करण्याची संधी आहे.   
विशाल पाटील बंडखोरी  
काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. सांगलीची जागा ठाकरे गटाला सुटल्याने जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. विश्वजीत कदम यांनी तर जाहीरपणे काँग्रेस नेत्यांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. असं असलं तरी आघाडी धर्म पाळत जिल्हातील काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा प्रचार केला. मात्र वसंतदादा घराण्यातील असल्याचा फायदा विशाल पाटील यांना होऊ शकतो.     
चंद्रहार पाटील मैदान मारणार?
महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आला. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असे गणित शिवसेनेने मांडले आणि परस्पर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद म्हणावी तशी नाही. काँग्रेस, शरद पवार गटाची मदत त्यांना होईल अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या चंद्रहार पाटलांचे गणित बिघडण्याची दाट शक्यता आहे. शेतकऱ्याचा मुलगा संसदेत जाणार, असा प्रचार चंद्रहार पाटलांनी केला. मात्र त्याचा कितपत फायदा झाला हे निकालातून स्पष्ट होईल. 
निवडणुकीतील गाजलेले मुद्दे
कवलापूर येथे विमानतळ, म्हैसाळ सिंचन योजना पूर्ण करणे, त्याचबरोबर ड्रायपोर्ट अशा मुद्द्यांवर निवडणूक झाली. याशिवाय चंद्रहार पाटील यांनी शेतकरी मुलाला उमेदवारी मिळाल्याचा भावनिक मुद्दा पुढे केला. तर विशाल पाटील यांनी पक्ष पातळीवर आणि घराण्यावर अन्याय झाल्याचा भावनिक मुद्दा उपस्थित केला होता. तर संजयकाका पाटील यांनी जिल्ह्यातील सिंचन योजना आणि राष्ट्रीय महामार्ग मार्गी लावल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
पायलट, भरकटलेले विमान आणि वाघ...
काँग्रेसच्या एका मेळाव्यात विशाल पाटील यांनी आपले पायलट विश्वजीत कदम असल्याचं सांगितलं होतं. विशाल पाटलांच्या या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. विमान भरकटलं असून पायलट विमानाला गुजरातला घेऊन जाणार, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावर विशाल पाटलांनी विमान दिल्लीत उतरले आहे, असा पलटवार केला होता.
उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या सभेत विश्वजीत कदम यांनी आपण सांगली जिल्ह्याचे वाघ असल्याचे विधान केलं होतं. यावर संजय राऊत यांनी म्हटलं होतं की, महाराष्ट्रातील वाघ शिवसेनाच आहे आणि सांगली जिल्ह्यातील वाघ जयंत पाटील आहेत. यावर विशाल पाटील यांनी म्हटलं होतं की विश्वजीत कदम हे वाघच आहेत. संजय राऊतांना वाघ बाहेर कशी शिकार करतो हे कदाचित माहित नसावं. वाघ संधी बघून झडप घालतो, असा टोला विशाल पाटील यांनी राऊतांना लगावला होता.
सांगलीतील मतदानाची आकडेवारी
सांगली लोकसभा मतदारसंघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 65.38  टक्के मतदान झालं होतं. यावेळी ही आकडेवारी 62.27 टक्के आहे.
जत विधानसभा मतदारसंघ - 60.76 टक्के
खानापूर विधानसभा मतदारसंघ - 58.93 टक्के
मिरज विधानसभा मतदारसंघ - 64.79 टक्के
पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ - 62.35 टक्के
सांगली विधानसभा मतदारसंघ - 60.97 टक्के
तासगाव विधानसभा मतदारसंघ - 66.98 टक्के
सांगली लोकसभेतील विधानसभानिहाय ताकद
सांगली लोकसभेमध्ये सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. यात जत, तासगाव, खानापूर, पलूस, सांगली आणि मिरज समावेश होतो. त्यापैकी पलूस आणि जत विधानसभेत काँग्रेसचे आमदार आहेत. तर तासगाव राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे. खानापूरमध्ये शिंदे गटाचे आमदार आहे. तर सांगली आणि मिरजमध्ये भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे दोन आमदार काँग्रेस आणि भाजपचे आहेत. तर एक राष्ट्रवादी आणि एक शिवसेना शिंदे गटाचे आहेत. 
जत - विक्रमसिंह बाळासाहेब सावंत (काँग्रेस)
पलूस - विश्वजीत कदम (काँग्रेस)
सांगली- सुधीर गाडगीळ (भाजप) 
मिरज- सुरेश खाडे (भाजप)
खानापूर- अनिल बाबर (शिवसेना)
तासगाव - सुमनताई पाटील (शरद पवार गट)