NC Times

NC Times

निवडून दिलं नाही तर मी राजीनामा देईल, पंकजा मुंडेंसाठी उदयनराजे जनतेसमोर नतमस्तक


नवचैतन्य टाईम्स बीड (प्रतिनिधी)- परळी येथे आज महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचार सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी उपस्थित असणारे भाजपचे नेते उदयनराजे यांचं भाषण चांगलंच चर्चेत आले आहे. उदयनराजे यांनी आपल्या भाषणात बीडमधून पंकजा मुंडे निवडून आल्या नाही तर मी स्वतः राजीनामा देऊन त्यांना साताऱ्यातून निवडून आणेल असं वक्तव्य केलं आहे. उदयनराजे यांचं हे भाषण चर्चेचा विषय ठरला आहे.
लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी पार पडणार आहे. यामध्ये बीड मतदार संघाचा समावेश आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे परळी येथे पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रचार सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी, अजित पवार, धनंजय मुंडे, उदयनराजे भोसले यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले की, ''पंकजा निवडून आल्या नाही तर मी स्वतः राजीनामा देऊन त्यांना साताऱ्यातून निवडून आणेल, पण असं होणार नाही तुम्ही लोक त्यांना नक्की निवडून द्याल''. दरम्यान उदयनराजे यांच्या या व्यक्तव्यानंतर व्यासपीठावर एकच हशा पिकला.
पंकजा मुंडे व महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात तगडी लढत पाहायला मिळणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोनावणे हे प्रीतम मुंडे यांच्या विरोधात उभे होते. त्यावेळी प्रीतम मुंडे यांच्याकडून सोनवणे यांचा दीड लाख मतांनी पराभव झाला होता. परंतु यंदाच्या निवडणुकीत शरद पवार यांनी स्वतः कंबर कसली असून एक चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
मराठा समाजाचे मत मिळवण्याचे मुंडेंसमोर आव्हान
मराठा आरक्षणाचा मुद्दा बीड जिल्ह्यात अजूनही चर्चेत आहे. अशातच बजरंग सोनवणे हे मराठा समाजाचे उमेदवार आहेत. त्यामुळे वंजारी समाज जरी पंकजा मुंडे यांच्या पाठीमागे उभा असला तरी मराठा समाजाचे मत मिळवण्यात त्यांना यश मिळणार का? हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.