NC Times

NC Times

स्टँप विक्रेते, डीटीपी व लॅमिनेशन झेरॉक्स वाल्यांना दरपत्रक लावणे बंधनकारक करा- सुनिल बागडे


नवचैतन्य टाईम्स जत (प्रतिनिधी)- जत येथे स्टँप व तिकीट विक्रेते आणि समोरील डीटीपी, लॅमिनेशन व झेरॉक्स वाल्यांकडून ग्राहकांची लुबाडणूक होत असून आर्थिक लूट केली जात आहे. ती थांबविण्याकरिता येथे दरपत्रक लावणे बंधनकारक करावे अशी मागणी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल बागडे यांनी केली आहे .
 जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून ही लूट थांबवावी अशी मागणी होत आहे. याबाबत बागडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली आहे. सब रजिस्टर कार्यालयासमोरील स्टँप व तिकीट विक्रेते आणि तहसील कार्यालयासमोरील झेरॉक्स आणि लॅमिनेशनवाल्यांनी ग्राहकांची आर्थिक लूट सुरू केली आहे. लूट करणाऱ्यांनी माणुसकी सोडली असल्याचे दिसून येत आहे. यामुळे व्यापारी मस्त झाले असले तरी ग्राहक मात्र त्रस्त झाले आहेत. उद्योग करणाऱ्यांनी व्यवसाय करताना कुठलेही तारतम्य ठेवले जात नाही. मनाला येईल त्याप्रमाणे दर आकारणी करायची आणि ती अडवणूक करून ग्राहकांकडून वसूल करायची. असा शिरस्ता येथे सुरू करण्यात आला आहे. बॉण्ड व तिकीट विक्रेते बॉण्ड व तिकीटांवरील मुद्रित किमतीपेक्षा जास्त पैसे घेऊन बॉण्ड व तिकीटांची विक्री करू लागले आहेत. तिकीट विक्रीमध्ये तर इथे ५ रुपये किमतीचे तिकीट चक्क दाम दुप्पट दराने म्हणजेच १० रुपयात विक्री केले जात आहे. इतर तिकिटांमागेही दीडपट किंवा दुप्पटीने रक्कम घेऊन तिकीट दिले जात आहे. हे कमी होते की काय म्हणून तहसील समोरील झेरॉक्स सेंटरवाल्यांनीही डीटीपी करून देण्याचे दर अव्वाच्या सव्वा करून टाकले आहे. ए-चारचा एक कागद टाईप करून द्यायचं म्हणल्यावर हे ८० ते १०० रुपये घेऊ लागले आहेत. एवढेच नाही तर कुणी मोबाईलवर टाईप केलेल्या मजकुराची किंवा डीटीपी केलेल्या कागदाची प्रिंट काढून द्या व त्यास लॅमिनेशन करून द्या म्हणून सांगितले तर त्याचेही १०० रुपये वसूल करू लागले आहेत. अशाप्रकारे तहसीलच्या आवारातील बॉण्ड व तिकीट विक्रेते आणि समोरील झेरॉक्स व डीटीपी दुकानवाल्यांनी अक्षरशः लूट चालविली आहे. या अवस्थेमुळे यांच्याकडून अधिकारी हप्ते तर घेत नाहीत ना? विक्रेत्यांकडून येथे बसायचे भाडे वसूल केले जाते की काय? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. ग्राहकांची होत असलेली आर्थिक लूट थांबविण्याकरिता येथे दरपत्रक ठळक अक्षरात लावणे बंधनकारक व सक्तीचे करावे. अशी मागणी  बागडे यांनी केली आहे.