NC Times

NC Times

रात्री दरवाजा उघडताच सपासप चाकूचे वार लेकासमोरच आईचा अंत


नवचैतन्य टाईम्स जालना(प्रतिनिधी)-एका हॉटेलवर गेल्या सात-आठ वर्षांपासून सुभद्राबाई अर्जुन वैद्य (वय ४० वर्ष) या भांडी धुण्याचे काम करत होत्या. चार महिन्यांपूर्वी सुभद्राबाईचा मुलगा सचिन (वय २०) याने सुभद्राबाईंना काम बंद करण्यासाठी सांगितले. त्यानुसार त्यांनी कामावर जाणं बंद केले. या हॉटेलच्या मालकाने वारंवार बोलावूनही त्या कामावर गेल्या नाहीत.
 सुभद्राबाई कामावर येत नसल्याचा राग मनात धरून हॉटेलचा मालक गणेश कातकडे (वय ४५) याने काल मध्यरात्री साडेबारा वाजता रामनगर साखर कारखाना परिसरात राहत असलेल्या सुभद्राबाई वैद्य यांच्या घरी गेला आणि त्यांना कामावर येण्यासाठी दबाव आणू लागला. परंतु परिसरातील नागरिकांनी कातकडेची समजूत काढत त्याला परत पाठवले. त्यानंतर पुन्हा रात्री दोन वाजता कातकडे यांनी सुभद्राबाईंच्या घराचे दार ठोठावले. बराच वेळ दार ठोठावल्यानंतर सुभद्रा बाईंनी दार उघडले. त्यावेळी गणेश कातकडे याने सोबत आणलेल्या चाकूने सुभद्राबाईंवर वार केल्याचे सांगण्यात येत आहे.
 सुभद्राबाईंचा ओरडण्याचा आवाज ऐकून घरातच झोपलेला सचिन हा बाहेर आला. त्याने हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला देखील चाकूचे चार वार लागले आहेत आणि त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हे भांडण सोडवण्यासाठी शेजारचा एक तरुण गेला असता त्याला देखील जखमी करण्यात आले आहे.
रात्री दीड वाजेच्या सुमारास ११२ वर सुभद्राबाईंची बहीण शितल ठोके यांनी कॉल केला होता. त्या अनुषंगाने गस्तीवर असलेले पोलिस राकेश नेटके, प्रकाश जाधव, धोंडीराम वाघमारे, हे घटनास्थळी दाखल झाले. सुभद्राबाई यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालय जालना येथे पाठवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी गणेश कातकडे हा पळून जात असताना मौजपुरी पोलिसांनी मंठा चौफुली परिसरात त्याला ताब्यात घेतले आहे.