NC Times

NC Times

वर्षभरात दोन कोटी रोजगार, गरिबांना दोनशे युनिट मोफत वीज केजरीवाल यांच्या दहा गॅरंटी


नवचैतन्य टाईम्स  नवी दिल्ली (प्रतिनिधी)-  दिल्लीचे मुख्यमंत्री तसेच आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे. कथित 'मद्यधोरण' प्रकरणातून केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. जामीन मिळाल्यामुळे केजरीवाल हे 'इंडिया' आघाडीचा प्रचार करण्यासाठी सक्रिय झाले आहेत. केजरीवाल यांनी आज आपच्या आमदारांबरोबर बैठकीचे आयोजन केले होते. दरम्यान, या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत इंडिया आघाडीचे सरकार आल्यास जनतेला १० गॅरंटी मिळतील असं आश्वासन दिले आहे.
 काय आहेत केजरीवाल यांच्या १० गॅरंटी ?
१. देशभरातील गरिबांना 200 युनिट मोफत वीज पुरवणार.
२ . देशातील सर्व सरकारी शाळा खाजगी शाळांपेक्षा उत्तम दर्जाच्या बनवल्या जातील. देशात जन्मलेल्या प्रत्येक मुलासाठी उत्तम, उत्कृष्ट आणि मोफत शिक्षणाची व्यवस्था केली जाईल.
३. प्रत्येकासाठी चांगल्या उपचारांची व्यवस्था केली जाणार. देशभरातील प्रत्येक गावात आणि परिसरात मोहल्ला दवाखाने उघडले जातील, जिल्हा रुग्णालये सुधारून अलिशान खासगी रुग्णालयांसारखी तयार केली जातील.
४. चीनने ताब्यात घेतलेली देशातील सर्व जमीन मुक्त केली जाईल. त्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले जाणार असून राजनैतिक पातळीवरही प्रयत्न केले जातील. सैन्याला रोखले जाणार नाही.
५.अग्नवीर योजना बंद केली जाईल. आतापर्यंत अग्निवीरमध्ये समाविष्ट झालेल्या सर्व मुलांची खात्री करून लष्करातील ही कंत्राटी पद्धत बंद केली जाईल. लष्कर आणि देशाच्या सुरक्षेसाठी जो काही पैसा खर्च करावा लागेल, तो ते करतील.
 ६. शेतकऱ्यांना सन्मानाचे जीवन देण्यासाठी स्वामिनाथन अहवालाच्या आधारे त्यांच्या पिकांचा पूर्ण भाव दिला जाईल.
७. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल.
८. वर्षभरात २ कोटी नवीन रोजगार निर्माण केले जातील.
९. भाजपची वॉशिंग मशीन उद्ध्वस्त होईल. प्रामाणिक लोकांना तुरुंगात पाठवण्याची आणि भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देण्याची व्यवस्था संपुष्टात येईल. दिल्ली, पंजाबप्रमाणेच खऱ्या अर्थाने भ्रष्टाचारावरही प्रहार होईल.
१०. जीएसटी दहशतवाद (कर दहशतवाद) संपुष्टात येईल. तसेच जीएसटी पीएमएलएमधून काढला जाऊन व्यापार आणि उद्योगाला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यासाठी सर्व कायदे आणि प्रशासकीय यंत्रणा सुलभ करण्यात येतील.
 केजरीवालांचा जामीन १ जूनपर्यंतच
केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या जामीनाची मुदत १ जूनपर्यंतच असणार आहे. केजरीवालांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी ४ जूनपर्यंत जामीन मिळावा अशी मागणी केली होती. मात्र, प्रचार ४८ तास अगोदर संपतो, असं सांगत न्यायालयाकडून केजरीवालांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आला. तसेच अरविंद केजरीवाल प्रचारादरम्यान या खटल्यावर काहीही बोलू शकत नाहीत, अशी अटही न्यायालयाकडून घालण्यात आली आहे.