NC Times

NC Times

वळवाने पाठ फिरविल्याने कवठेमहांकाळच्या घाटमाथ्यावरील शेतीच्या मशागती खोळंबल्या


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे)
कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील घाटनांद्रे        तिसंगी,वाघोली,गर्जेवाडी,कुंडलापुर,जाखापुर व कुची  परिसरात कुची व जाखापुर परिसरात झालेला तुरळक पाऊस वगळता इतरत्र वळवाने अगदीच पाठ फिरविल्याने खरीपाच्या पेरणीपूर्व मशागती पुर्णतः खोळंबल्याचे सध्याचे कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील चित्र आहे.त्यामुळे बळीराजाच्या सर्वच नजरा या आभाळाकडे लागल्या आहेत.
चालू खरीप हंगाम हा केवळ महीन्यावर येऊन ठेपला आहे.सध्या मे महिना मध्यावर आला तरी घाटमाथ्यावर वळीवाचा कसलाच पाऊस न झाल्याने सर्वत्र खरीपाच्या पेरणीपूर्व मशागती खोळंबल्या आहेत.तश्या मशागती या मार्च, एप्रिल मध्येच पुर्ण होऊन मे महिन्याच्या प्रखर उन्हात रान तापायला ठेवले जाते.याला शास्त्रीय भाषेत  'सॉईल सोलरायझेशन' असे म्हणतात.
चालू मे महिन्यात वळीवाचा पाऊस झाल्यास नांगरट केल्याने तयार झालेली ढेकळे फुटुन रान भुसभुशीत व व्यवस्थीत होऊन पेरणीस योग्य होते.पण या भागात वळवानेच संपुर्णपणे पाठ फिरविल्याने रानातील पेरणीपूर्व मशागतीच थांबल्या आहेत.
परंतु काही शेतकरी हे पेरणीपूर्व मशागती या मोठ्या धाडसाने करत आहेत.घाटमाथ्यावर सततच्या दुष्काळाने बैलांची संख्याच रोडावल्याने सर्व शेतकरी हे ट्रॅक्टर म्हणजे अर्थात यांत्रिकीकरणाचा आधार घेत आहेत,डिझेल,पेट्रोल    भाव वाढीमुळे आपसुकच नांगरटी सारख्या मशागतीचे दरही वाढले आहेत.घाटमाथ्यावरील पुर्णतः शेतीही पावसावर आधारित आहे.येथील शेती ही काळी कसदार असुन पाऊस वेळेवर व प्रमाणात झाला तर खूप मोठा पीक परतावा या शेतातून मिळतो पण बरेच वर्षे झाले तसं काही घडले नाही.