NC Times

NC Times

डावपेच


महाबळेश्वर तालुक्यातील एका हायस्कूलमध्ये इ. आठवी ते बारावी इयत्तेत  मराठी विषयाचा शिक्षक म्हणून कार्यरत होतो. पावसाळी व दुर्गम भागात काम करताना कडक कपड्यांना कधीच महत्त्व दिले नव्हते. साधी रहाणी असल्याने माझे व्यक्तिमत्व सर्व सामान्य होते. त्यामुळे विशेष लोकांना अपरिचित होतो.पहिल्या सहा महिन्यात ग्रंथालयातील सर्व पुस्तकांचे वाचन झाले होते.स्टाॅफरुममध्ये  काही चारपाच महिला मिळून सतरा जण होतो. काही जुणे तर काही माझ्यासारखे नवीन लागले होते. मराठी शिकवताना चित्त प्रसन्न व आनंदीत होत होते. अनेक संदर्भ येत असल्याने गद्य पद्य घटक मुलांना आकलन होत होते. मुले माझ्या तासाची वाट पहात होती. तेथील बरेच शिक्षक संस्था व मुख्याध्यापक यांच्या मधले दुवे होते. जुणे नव्या शिक्षकांना धाकात ठेवत होते.वेगवेगळ्या पध्दतीने त्रास देत होते. नवीन शिक्षकांच्या चपला दडवणे,छत्री कपाटाच्या मागे अडगळीत टाकणे, कपाटातील घटक चाचणी किंवा सहामाही परीक्षेचे गठ्ठे अचानक गायब करणे, ते सर्व गठ्ठे दुसऱ्या शिक्षकांच्या कपाटात सापडणे. अशा संशयाने प्रत्येक जन एकमेकावर जळत होते. शाळा प्रमुख अत्यंत हलक्या कानाचे होते.कोणीही काहीही दुसऱ्या विषयी चुगली केली तर त्यांना ती खरी वाटत होती. आठवड्यातून फक्त तीनच दिवस ते हजर असायचे. यामुळे इतर दिवशी शाळेत काय काय घडले यांची माहिती शिपाई व शिक्षक शाळेत आल्यानंतर सांगत होते. त्यामध्ये काही शिक्षक, शिक्षिका,लिपीक,व ग्रंथपाल अश्लिल गुन्हेगार होते.अशा चारित्र्यहीन, लबाड, धूर्त, चलाख कर्मचाऱ्यांना संस्थेने आदर्श पुरस्कारांनी सन्मानित केले होते. हे मी जाणून होतो. प्रत्येक वर्गात शिक्षकांची मुले शिकत होती.पेपर तपासताना माझ्या मुलांचे गुण कमी केलीअसतील असा संशयाचा कांगावा करुन मोठमोठ्याने स्टाफरुममध्ये भांडत होते.अमक्या शिक्षकाने तुमच्या मुलांचे पेपर तपासताना माझ्या समोर गुण कमी केलेले आहेत. असे विचित्र वातावरण शिजवत होते.एखाद्या नवीन शिक्षकांनी कॅंम्प्यूटरवर बनवलेल्या निकालात अचानक कोणीतरी गुण बदललेले दिसून यायचे. मग संपूर्ण निकाल पुन्हा करावा लागत होता. हे सर्व पाहून मी अत्यंत दु:खी व उदास होत होतो. कारण मी एका कॅंम्प्यटरवर पस्तिस लेख टाईप केले होते.हेतू हा की मला पहिले पुस्तक छापावयाचे होते.  पण ते सर्व लेख देवकुळे सरांनी मुळातून डिलीट केल्याचे कितीतरी दिवसांनी मला समजले. या विचित्र वातावरणात मी मन लावून शिकवत होतो. मनाचा तोल सांभाळून कामकाज पहात होतो. अचानक संस्था पातळीवर शालेय तपासणीत माझा सर्वजन गवगवा करीत .संस्था मिटिंगमध्ये माझ्या अध्यापनाचा कुतूहलाचा विषय गाजत होता. दहावी व बारावीच्या निरोप समारंभाला विद्यार्थ्यांच्या टाळ्यांचा गजर होणे हे अनेकांना डोकेदुखी वाटत होती. संस्थेतील सदस्यावर विश्वास ठेवावा असे कोणीही चारित्र्य संपन्न नव्हते. अनेकांना औरस आणि अनौरस संतती होती, उद्या आपल्या विरुध्द कपट कारस्थान किंवा बेबनाव झाला तर आपणाला वाली कोणीही असणार नाही. या विचाराने मी हतबल होत होतो. श्री खाशाबा कातोरे हे संस्थेचे सचिव जरी होते. तरी पण त्यांची दहशत व दरारा भयंकर होता. त्यांच्या वाढदिवसाला श्री.खाशाबा कातोरे सचिव. कार्य आणि कर्तृत्व हा लेख लिहून दैनिक पुढारी या वृतपत्रात व गोव्याच्या मासिकातून प्रसिद्ध झाला होता. त्याचा परिणाम बाकीच्या लोकांचे धाबे चांगलेच दणाणले होते. सरांच्या मनात मी माझी जागा तयार केली होती. तोच मला एकमेव आधार वाटत होते.एकदा शालेय पट पडताळणीसाठी झेडपीचे अधिकारी शाळेत आले होते. त्यावेळी माझ्याकडे इ. आठवी (ब) चा वर्ग होता.एकूण मुले व मुलींची संख्या ही पंचावन्न होती. परंतु काही दहा ते बारा मुले शाळेत येत नव्हती परिणामी कितीही निरोप दिले बोलावणे धाडले तरी ती येत नव्हती.ही बाब मी डोईफोडे मुख्याध्यापकांच्या कानावर घातली होती. त्यांनी फक्त ऐकून घेतले पण उपाय सुचवला नाही.हजेरी घेऊन आलो तेव्हा बारा मुलांची उपस्थिती पर्यवेक्षकांच्या सांगण्यावरुन लावली    होती.पटपडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्याने सर्व शाळेतील कॅटलॉगची वर्गात जाऊन तपासणी केली. तेव्हा त्यांना माझ्या वर्गातील बारा मुले गैरहजरअसताना उपस्थिती लावल्याचे दिसूनआले. बारा मुलांना आपण बोलावून घ्यावे. आम्ही पुढील आठवड्यात पुन्हा येत आहोत. असे मुख्याध्यापकांना सांगितले.पण त्यांनी ते मनावर घेतले नाही. परत पहिल्या सारखाच प्रकार घडून आला. परिणामी वर्गशिक्षक म्हणून मी अडचणीत सापडलो,आणि जुन्या लोकांनाआयती संधी मिळाली. सर्व संस्थेत एकच चर्चा व अफवा पसरवली गेली की, पटपडताळणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना लावंड सरांनी असे सांगितले की, ही बोगस मुले आहेत, आणि त्यामुळे ती वर्गात असणार नाहीत.तो संपूर्ण दिवस गोंधळात व दबावाखाली गेला होता.डोईफोडे मुख्याध्यापकांनी फोन वरुन सर्व संस्था चालकांना संभाव्य घटनेचा उल्लेख करुन एका तुकडीच्या अस्तित्वाचा प्रश्न एका शिक्षकांने निर्माण केला आहे.तरी सोमवारी अकरा वाजता शाळेत यावे. सदर शिक्षकांची एक वेतनवाढ रोखून धरत आहोत.त्या दिवशी शनिवारी शाळा सुटल्यानंतर वाईला राहत्या घरीआलो. सायंकाळी वाई हायस्कूलचे एक शिक्षक घरी आले होते. त्यांनी गणपती उत्सवानिमित्त कथाकथनासाठी मला सोमवारी आमंत्रित केले होते.मी लगेच मुख्याध्यापकांना फोन वरुन कार्यक्रमासाठी जात आहे. तरी आपण संमती द्यावी. त्यांनी लगेच होकार दिला.सोमवारी साठे मंगल कार्यालयात सर्व विद्यार्थ्यांच्या समोर "माझ्या बापाची पेंड" या कथेचे कथाकथन झाले होते. एक दीड तासात श्रोते खळखळून, पोट धरून हसत होते. माझे मन खूप अस्थिर झाले होते. कारण मी या विराट समूहाला जरी हसवत असलो तरी माझ्या शाळेतील संस्था मिटींगमध्ये चारित्र्यावर ताशेरे ओढले जात असावेत असे मला राहवून राहवून सारखे वाटत होते. कथाकथन झाले नंतर मी घरी अत्यंत चिंतायुक्त अंत:करणाने आलो होतो. आमच्या शेजारील चौधरी काकांचा पाळीव कुत्रा माझ्या जवळ वेदनेने विव्हळत आला होता. मी त्याचेकडे बारकाईने पाहीले तेव्हा त्याच्या मानेपासून पाठीमागे रक्त ठिबकत असल्याचे माझ्या लक्षात आले. बाहेरील कुत्र्यांनी त्याच्यावर जोरदार हल्ला करुन अणकुचीदार दातांनी चावा घेऊन वेगाने हिसकल्यामुळे  कातडे व मांस शरीरापासून अलग होऊन लोंबकळत होते. ते पाहून माझे दु:ख व त्याचे दु:ख एक झाले, आणि असाहय्यतेने घरच्यांच्या लक्षात येणार नाही अशा अवस्थेत आसवांना  वाट करुन दिली होती.ती रात्र मी तळमळत काढली होती. दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये जड अंत:करणाने वेळेत पोहचलो होतो. मस्टरवर सही करुन स्टाफरुममध्ये आलो तर सर्वजन आपापल्या कामात होते.कालच्या संस्थातर्गत मिटिंगमध्ये काय झाले असेल, आणि आता कार्यवाही होणार या भीतीने प्रार्थने नंतरचा  पहिला तास संपत आला होता. विरोधकांच्या चेहऱ्यावर कसलाच आनंद दिसत नव्हता. शाळेतील प्रमुख कमालीचे शांत झाले होते. कारस्थान करणारे खाली मान घालून काम करीत होते. दुसऱ्या तासाला अध्यक्षांची गाडी शाळेतील मैदानावर आली आणि माझी भितीने तारांबळ उडाली होती. काही तरी काम करुन लगेच ते गाडीत बसून बाहेर गेले सुध्दा.माझ्या मनातील चल बिचल एका नवीन व शांत दयानंद भिंगारे नावाच्या शिक्षकांने हेरली होती.त्यांनी मला वसतीगृहाच्या पाठीमागे यावयाचा हाताने गुप्त संदेश दिला होता.ऑफ तासालाआम्ही दोघे वेगवेगळ्या वाटांनी वसती गृहाच्या मागे समोरासमोरआलो.आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. काल जर तुम्ही शाळेत उपस्थितअसता तर संस्थेतील लोकांच्या रोषापुढे पुढे घरी जावे लागले असते. कारण संस्थेत फार मोठा गदारोळ माजला होता. सर्व शिक्षका समवेत मिटींग आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा होता की, सरांनी अधिकाऱ्याला ही मुले बोगस आहेत. असे का सांगितले? या वरुन हा शिक्षक आपल्या शाळेला कमीपणा का देतो आहे?मुख्याध्यापक व पर्यवेक्षक श्री मुरलीधर वाकडे यांनी सदर व्यक्तीला वारंवार सांगून सुध्दा ते आमचे अजिबात ऐकत नाहीत? असे प्रतिपादन करुन स्वतःबाजूला नामानिराळे राहीले. आता मुद्दा प्रत्यक्ष कार्यवाहीचा निघाला की, सदर शिक्षकाला अन्य तऱ्हेने कामकाज ठीक करता येत नाही म्हणून बडतर्फ करावे असे ठरले.त्यावेळी एक घटना अशी घडली की, श्री खाशाबा कातोरे यांनी असे म्हटले की, सदर शिक्षकावर कार्यवाही होणार आहे, ती व्यक्ती कोण आहे? त्यांनी या मिटींगमध्ये उपस्थित व्हावे. सर, तुम्ही नसल्याने तो प्रसंग पुढे वाढला नाही. लावंड सरांचे नाव समजल्यावर श्री खाशाबा कातोरे सचिवांनी  स्वतः मिटिंगमध्ये तुमची बाजू घेऊन बोलू लागले की. लावंड सरांनी अधिकाऱ्याला ही बोगस मुले आहेत असे सांगितले,असे सगळ्याचे मत आहे. तर मग ही बातमी प्रथम कोणी ऐकली त्याने प्रथम पुढे यावे.या वेळी सर्वजण खाली माना घालुन बसले होते. नंतर सरांनी सर्व शिपाई शिक्षक व मुख्याध्यापकांना तोच वरील प्रश्न विचारला त्यावेळी सर्वजण शरणागतासारखे फक्त उभे होते.मुले गैरहजर रहातात त्यांना शाळेत आणावयाची जबाबदारी फक्त एकट्याची नसून ती शिक्षक मुख्याध्यापक व संस्थेची असते. तेव्हा लावंड सरांना शाळेने दोषी ठरवू नये. कारण तो शिक्षक माणूस वरिष्ट अधिकारी यांना असे अजिबात सांगणार नाहीत,याचा मला आत्मविश्वास आहे,आणि मिटिंग संपुष्टात आली. इतक्यात पुढील तासाची बेल वाजल्यानंतर आम्ही दोघे विरुद्ध दिशेने वर्गावर निघून गेलो.
 प्रा. संभाजी लावंड वाई,                                 """""""""""""""""""