NC Times

NC Times

सांगलीत काँग्रेसच्या स्नेहभोजनात काय शिजलं?बंडखोर विशाल पाटलांचं प्रमुख उपस्थिती


नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी(संजय शिंदे)- सांगली लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत असूनही काँग्रेस कोणाच्या पाठीशी होती, हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. कारण काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी निवडणूक प्रचारासाठी राबलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी श्रम परिहार म्हणून स्नेहभोजन आयोजित केलं होतं. विशेष म्हणजे या स्नेहभोजन सोहळ्याला काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासह काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
या निमित्ताने विशाल पाटील यांनी स्नेहभोजनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचे आभार देखील मानले आहेत .सदर स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाची पत्रिका पृथ्वीराज पाटील यांच्याकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना धाडली गेली होती, ज्यामध्ये स्नेहभोजनाचे निमित्त आणि प्रमुख उपस्थिती असणाऱ्या विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांच्या नावांचा उल्लेख होता.
 वास्तविक महाविकास आघाडीतील सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस असल्याचे निवडणुकी दरम्यान काँग्रेसकडून वारंवार सांगण्यात आलं होतं, मग असं असलं तर श्रमपरिहाराच्या स्नेह भोजनाला चंद्रहार पाटलांच्या ऐवजी विशाल पाटलांची प्रमुख उपस्थिती कशी? अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात विश्वजीत कदम कोणाच्या बाजूने आहेत हे चार जून रोजी कळेल, असे खुद्द विश्वजीत कदम यांनी थेट सांगितले होते. त्यामुळे सांगलीतील काँग्रेसने नेमके कोणाचे काम केले, हे पहावे लागणार आहे.
सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. उद्धव ठाकरे यांनी पैलवान चंद्रहार पाटील यांना परस्पर उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसची नाराजी वाढली. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल प्रकाशबापू पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे सांगली लोकसभेतील लढत तिरंगी झाली आहे
कोण आहेत विशाल पाटील?
- वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन
- विशाल पाटील सध्या कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष
- माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचे नातू
- स्व. खासदार प्रकाशबापू पाटील यांचे तृतीय चिरंजीव
- आई शैलजा भाभी पाटील , महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा
- बंधू, प्रतीक पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री